पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. या विषयावरून इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) नेते अशी ओळख असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक संघर्ष वैयक्तिक टीकेवर येऊन पोहोचला आहे. दोन्ही बाजूने राज्यभरात मोठ्या सभा होत असल्याने ध्रुवीकरण होत आहे. त्याचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत केडगावात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांच्या पॅनेलला धक्का देत केडगाव विकास आघाडीच्या पूनम बारावकर सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्यामागे स्थानिक ओबीसी घटकांनी मोठी भूमिका निभावली आहे. या ओबीसी एकजुटीची सध्या सर्वत्र चर्चा असून या एकजुटीला बळ देण्यासाठी मंत्री भुजबळ हे पुणे जिल्ह्यातील इंदापुरात शनिवारी सभा घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : राज्यावर जलसंकटाचे सावट; धरणांमध्ये ६६.३१ टक्केच साठा, गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के घट 

हेही वाचा : पुण्यातील प्रसिद्ध ‘पूना गेस्ट हाऊस’ आता चक्क टपाल पाकिटावर

मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे, तर भुजबळांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत याचा अनुभव आला. दौंड तालुक्यात रासपमधून भाजपात आलेले राहुल कुल सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत, तर माजी आमदार आणि पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांचा देखील या ठिकाणी दबदबा आहे. या दोन्ही नेत्यांनी या निवडणुकीत त्यांचे पॅनेल उभे केले होते. मात्र, आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील ओबीसी नेते एकवटले होते. येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले होते. राजकारणात नवख्या असलेल्या बारवकर यांनी ५४४ मते घेत विजय साकारला. यामागे ओबीसींनी गट-तट बाजूला ठेवून केलेल्या एकजुटीचा विजय असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर या भागात भुजबळ यांची सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार इंदापूर येथील पंचायत समितीच्या मैदानावर शनिवारी सभा आयोजित केल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब कापरे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune at indapur minister chhagan bhujbal public meeting to protect obc reservation pune print news psg 17 css