पुणे : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे राज्याच्या सहा विभागांतील धरणांतील पाणीसाठा ६६.३१ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्या वर्षी याच वेळी ८७.१० टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा २० टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण या सहा विभागांमध्ये २५९५ लहान, मध्यम आणि मोठे धरणप्रकल्प आहेत. धरणांमधील पाणी राज्यातील शेती, नागरिकांना पिण्यासाठी, तसेच औद्याोगिक कारणांसाठी वापरण्यात येते. यंदा काही अपवाद वगळता बहुतांश धरणे १०० टक्के भरलीच नाहीत. सध्या राज्यातील कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक ८२.६३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या विभागात याच वेळी ८३.१५ टक्के पाणीसाठा होता. छत्रपती संभाजीनगर विभागात सध्या ३७.६३ टक्के एवढा राज्यातील नीचांकी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या भागात ८७.३१ टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागात ७१.७८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ७९.४६ टक्के होता.
हेही वाचा >>>निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन कसे कराल? ‘लोकसत्ता अर्थभान’चे शनिवारी पिंपरीत आयोजन
अमरावती गेल्या वर्षी ९१.५२ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ७५.६२ टक्के आहे. पुणे विभागातही पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या वर्षी या विभागात ८८.०८ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ७०.३९ टक्के आहे. नाशिक विभागात गेल्या वर्षीच्या ८९.८९ टक्के पाणीसाठ्याच्या तुलनेत सध्या ७०.६१ टक्के साठा आहे.
उन्हाळ्यात जलसंकट आणखी गहिरे
पावसाळा संपून तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीतच धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
●ऐन थंडीच्या दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि शहरांत पाणीकपातीला सुरुवात झाली आहे.
●जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्थानिक पातळीवरील मागणीनुसार टँकर सुरू करण्यात आले आहेत.
●उन्हाळ्यात पाण्याची वाढती मागणी, पाणीचोरी-गळती, बाष्पीभवन यामुळे जलसंकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.