पुणे : नाना पेठेत आंदेकर टोळीने केलेल्या बेकायदा बांधकामांवर पोलिसांनी महापालिकेच्या सहकार्याने कारवाईचा बडगा उगारलेला असताना हडपसर-सय्यदनगरमधील गुंड टिपू पठाण याने बांधलेले बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले. काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने शुक्रवारी ही कारवाई केली.

हडपसरमधील सय्यदनगर परिसरात गुंड रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याची दहशत आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पठाणने एका महिलेला धमकावून तिच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतला होता. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. पठाणने एका कार्यक्रमात नोटाही उधळल्या होत्या. पठाण याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पठाण याच्यासह १६ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पठाणसह साथीदारांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. दरम्यान, पठाण टाेळीतील पसार साथीदार शाहरूक उर्फ हट्टी याचा मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता.

पठाणने सय्यदनगर भागात बेकायदा कार्यालय उभे केले होते. ख्वाजा मंजिल इमारतीच्या परिसरात बेकायदा कार्यालय, टपऱ्या उभ्या केल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील,आणि पथकाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने शुक्रवारी पठाण याच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.