पुणे : पोषणयुक्त आहारासाठीचा सल्ला आणि पोषणआहार अभ्यासक्रमांचे शिक्षण आता एकाच ठिकाणी घेणे शक्य होणार आहे. कर्वे रस्ता येथील एसएनडीटी गृहविज्ञान महाविद्यालयात ‘न्यूट्रिडेक’ (न्यूट्रिशन अँड डाएट एज्युकेशन सेंटर) या केंद्राची स्थापना करण्यात आली असून, या केंद्राद्वारे नागरिकांना पोषणयुक्त आहाराबाबतचे मार्गदर्शन, वैद्यकीय प्रशिक्षण, आहार नियोजन, समुपदेशन, क्लिनिकल न्यूट्रिशन याविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते ‘न्यूट्रिडेक’ केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. संकुल समन्वयक प्रा. शीतल मोरे, प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण, प्राचार्य भरत व्हनकटे, प्रा. वीरेंद्र नगराळे, प्रा. सचिन देवरे, प्रा. सुभाष पाटील, प्रा. विलास जाधव, डॉ. भास्कर इगवे, प्रा. रचना शिखरे या वेळी उपस्थित होते.

‘पोषण व आहाराविषयी समाजात जागृती करण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठ सातत्याने कार्यरत आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण मिळेल आणि समाजालाही थेट फायदा होईल, असे प्रा. चक्रदेव यांनी सांगितले. आरोग्य आणि पोषणाबाबत विद्यापीठाने सुरू केलेला प्रयोग महत्त्वपूर्ण आहेत. या माध्यमातून पोषण अभियानास चालना मिळण्यास मदत होईल, असे डॉ. भारूड यांनी सांगितले.

‘न्यूट्रिडेक’ हे केंद्र समाजासाठी पोषण सल्ला सेवा केंद्र आणि क्लिनिकल ट्रेनिंग सेंटर म्हणून कार्यरत असणार आहे. तसेच, पदवी, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थिनींना डाएट नियोजन, समुपदेशन, क्लिनिकल न्यूट्रिशन याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थानिक समुदायालाही परवडणाऱ्या दरात, तथ्यावर आधारित आहार मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थिनींकडून तयार केले जाणारे खाद्यपदार्थ आणि इतर उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी ‘संस्कृता’ हे दालन या पूर्वीच सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.