पुणे : घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्यात वाढली आहे. अनंत चतुर्दशीनंतर सलग दोन दिवस मार्केट यार्डातील घाऊक बाजाराचे कामकाज बंद होते. रविवारी मागणी वाढल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लाॅवर, वांगी, घेवड्याच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१ ऑक्टोबर) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गुजरात, कर्नाटकमधून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो घेवडा, इंदूरमधून ५ ते ६ टेम्पो गाजर, बंगळुरूतून १ टेम्पो आले. मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ४ ते ५ टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ३५ ते ४० ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा : ‘माननीयां’ना वेळ नसल्याने पिंपरीतील यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई रखडली

पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, टोमॅटो ८ ते १० हजार पेटी, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, पुरंदर, वाई, सातारा भागातून मटार ६ ते ७ टेम्पो, पावटा २ ते ३ टेम्पो, भुईमूग शेंग १०० ते १२५ गोणी, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पाे, काकडी ७ ते ८ टेम्पो, कांदा १२५ ट्रक अशी आवक झाली.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा सुरू करा, आमदार महेश लांडगे यांची मागणी

पालेभाज्यांचीही दरवाढ

फळभाज्यांप्रमाणेच पालेभाज्यांची आवक वाढली. कोथिंबिर, शेपू, मुळा, पालक या पालेभाज्यांच्या मागणीत वाढ झाली. कोथिंबिर, शेपू, मुळा, पालक या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली असून, पुदीना, राजगिरा, चवळईच्या दरात घट झाली आहे. मेथी, कांदापात, चाकवत, करडई, चुक्याचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात कोथिंबिरीच्या दीड लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे- कोथिंबीर- १५०० ते २५०० रुपये, मेथी- ८०० ते १५०० रुपये, शेपू- ४०० ते ७०० रुपये, कांदापात- ६०० ते १००० रुपये, चाकवत- ४०० ते ७०० रुपये, करडई- ३०० ते ६०० रुपये, पुदिना- २०० ते ६०० रुपये, अंबाडी- ३०० ते ७०० रुपये, मुळा- ४०० ते १००० रुपये, राजगिरा- ४०० ते ६०० रुपये, चुका-४०० ते ८०० रुपये, चवळई- ३०० ते ६०० रुपये, पालक ८०० ते १५०० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune prices of fruits and leafy vegetables raised due to increased demand pune print news rbk 25 css
Show comments