पिंपरी : शहरातील १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते, मंडई, इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पद्धतीने साफसफाईला १५ ऑगस्टपासून सुरुवात करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र, प्रशासनाने दिलेले आतापर्यंतचे चार मुहूर्त हुकले आहेत. नेत्यांच्या हस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईला प्रारंभ करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. नेत्यांकडून वेळ मिळत नसल्याने यांत्रिकी रस्ते साफ सफाईला मुहूर्त मिळत नसल्याची चर्चा आहे. महापालिकेमार्फत शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे कामकाज करण्यात येते. निविदा प्रक्रियेद्वारे डी. एम. एंटरप्रायजेस आणि बी.व्ही.जी. इंडिया या दोन संस्थांना काम दिले होते.
त्यांची मुदत संपल्यानंतर २०२० मध्ये १८ मीटर व त्यावरील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाईसाठी विभागनिहाय दर मागविण्यात आले. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग करून चार पॅकेजमध्ये हे काम केले जाणार आहे. दक्षिण भागासाठी ३३१ किलोमीटर अंतराचे आणि उत्तर भागासाठी ३३९.१५ किलोमीटर अंतराचे मोठे रस्ते आहेत. त्यामध्ये शहरातील महामार्ग, बीआरटीएस मार्ग, १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते तसेच मंडई व इतर मोकळ्या जागांचा समावेश आहे. प्रत्येक भागासाठी १६ मोठी वाहने, १६ इतर वाहने आणि ५५ कर्मचारी असणार आहेत. १६ वाहनांमार्फत प्रत्येकी ४० किलो मीटर रस्ते साफ केले जाणार आहेत.
हेही वाचा : ‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
रस्ते सफाईची निविदा जुलै २०२२ मध्ये राबविली होती. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही प्रत्यक्षात कामकाज सुरू झाले नाही. जूनमध्ये महापालिकेने चार एजन्सीला कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) दिली आहे. रस्ते साफ करणारी वाहने जर्मनी आणि इटलीतून आणली आहेत. काही मोटारींच्या नोंदणीची परिवहन कार्यालयाची (आरटीओ) प्रक्रिया सुरू आहे. तसेच राज्यातील मंत्र्यांना बोलावून शहरात एक मोठा कार्यक्रम घेण्याचे महापालिकेचे नियोजन असून, मंत्र्यांची वेळ मिळाल्यानंतर हा कार्यक्रम होणार असल्याचे समजते. “महापालिकेने २७ जून रोजी कार्यारंभ आदेश दिले होते. तीन महिन्यांत म्हणजे २७ सप्टेंबरपर्यंत मशिनरी खरेदी करण्याची प्रक्रिया करून काम सुरू करणे अपेक्षित होते. परिवहन कार्यालयाकडे वाहन नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठवड्यात यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईला सुरुवात होईल”, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.