लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे. पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करण्यात येणार आहे. तांत्रिक तपासातील अडथळे, तसेच मर्यादा विचारात घेऊन आता पोलिसांकडून खबऱ्यांचे जाळे पुन्हा कार्यरत करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात सोमवारी तपास अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेले मोबाइल वापरकर्ते, त्यांचे नाव, पत्ते याबाबतच्या माहितीचे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. घाटापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराइतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
आणखी वाचा-पुणे : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू, उत्तमनगर परिसरात अपघात
बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. आरोपींची माहिती असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. पुण्यासह सोलापूर, तसेच सातारा जिल्ह्यातील सराइतांची माहिती संकलित करण्यात येत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी संकलित करण्यात आलेल्या माहितीचे ‘एआय’तंत्रज्ञानाच्या आधारे विश्लेषण करण्यात येणार आहे. बोपदेव घाटातील टेबल पॉईंट परिसरात महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राला गुरुवारी मध्यरात्री मारहाण करण्यात आली. तरुणीवर आरोपींनी बलात्कार केला. आरोपींनी मारहाण करण्यासाठी वापरलेला बांबू आणि रक्त आढळून आले. पोलिसांनी रक्ताचे नमुने, बांबू, तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. संबंधित नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील पहिले संविधान भवन
पोलीस पाटलांची मदत
तपासात सासवड, जेजुरी, फलटण, बारामती, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील विविध गावांतील पोलीस पाटलांची मदत घेण्यात येणार आहे. पोलीस पाटील, सरपंचांचा जनसंपर्क चांगला असतो. त्यामुळे तपासात त्यांची मदत घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
© The Indian Express (P) Ltd