पुणे : वारंवार आवाहन करूनही वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत पुणे परिमंडलातील ४० हजार ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे परिमंडलातील ६ लाख ६ हजार ५६८ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे मिळून १३२ कोटी ८९ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहे. यामध्ये पुणे शहरातील २ लाख ६५ हजार ३५८ ग्राहकांकडे ४४ कोटी ७८ लाख आणि पिंपरी चिंचवड शहरातील १ लाख २८ हजार ५ ग्राहकांकडे ३३ कोटी ८ लाख रुपये, तर ग्रामीणमध्ये आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील २ लाख १३ हजार २०५ ग्राहकांकडे ५५ कोटी ३ लाख रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : पगार मागितला म्हणून साफसफाई करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण

महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्त्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच आहे. वीज खरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापना हा सर्व खर्च वीजबिल वसुलीवरच अवलंबून आहे. मात्र, वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला वेग देण्यात आला. यात गेल्या दीड महिन्यात ४० हजार ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये पुणे शहरातील २७ हजार ८४, पिंपरी चिंचवड शहरातील ७ हजार ४४ तर ग्रामीणमध्ये आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील ६ हजार ७८७ थकबाकीदारांचा समावेश आहे.

हेही वाचा – पुणे : शहरासह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचे कामकाज पूर्ववत

एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the last month and a half electricity supply to more than 40 thousand arrears in pune circle stop by mahavitran pune print news vvk 10 ssb