पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार त्यांच्या विरोधकांनी उभे केले होते. पण, त्यापैकी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बंधारपाडा येथील संजय सुभाष वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तर, उरणमधील संजोग रवींद्र पाटील यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे संजोग वाघेरे यांची थोडी डोकेदुखी कमी झाली आहे. एक वाघेरे बाद झाला पण संजोग पाटील यांचा अर्ज वैध ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी एकाने तर पाचव्या दिवशी तीन अर्ज दाखल झाले. त्यात शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश होता. २३ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्यासह सहा तर २४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी यांच्यासह आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, २५ एप्रिल, शेवटच्या दिवशी २० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

हेही वाचा…पिंपरी : ज्यांना पाडले, त्यांचाच प्रचार; एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये… जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला

एकूण ३८ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची शुक्रवारी (२६ एप्रिल) छाननी केली. त्यापैकी संजय वाघेरे यांची मतदार यादीची सांक्षाकीत प्रत नसल्याने अर्ज बाद झाला. त्यांना नोटीस दिली होती. पण, त्यांनी त्यांचे उत्तर दिले नाही. तर, काँग्रेसचा ए, बी फॉर्म नसल्याने गोपाळ तंतरपाळे यांचा तर राष्ट्रीय वाल्मिकी सेना पार्टीचे राजेंद्र मानसिंह छाजछिडक यांचाही अर्ज बाद झाला आहे. तिघांचे अर्ज बाद झाले असून ३५ जणांचे वैध ठरले आहेत.

हेही वाचा…मुरलीधर मोहोळ यांच्या पदयात्रेत गुंडांचा समावेश; महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बंधारपाडा येथील संजय सुभाष वाघेरे आणि उरणमधील संजोग रवींद्र पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचे नाव आणि आडनावाशी नामसाधर्म्य असलेल्या या दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याने वाघेरे यांची कोंडी झाली होती. त्यापैकी संजोग पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना खासदार बारणे यांचे समर्थक माऊली घोगरे सोबत होते. त्यांच्या खिशावर धनुष्यबाणाच्या चिन्हासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीरंग बारणे यांचेही छायाचित्र होते. त्यामुळे बारणे यांनीच मतविभागणीसाठी ही खेळी खेळल्याचे दिसून आले. पण, त्यापैकी संजय सुभाष वाघेरे यांचा अर्ज बाद झाला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent candidate with similar name to maha vikas aghadi s sanjog waghere patil in maval has nomination rejected pune print news ggy 03 psg