पुणे : लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी खोकल्यावरील औषधे (कफ सिरप) आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कप सिरप घेतल्यामुळे मध्य प्रदेशात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने कफ सिरपबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.
सर्व आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार तयार केलेली आणि उच्च औषधी दर्जाची कफ सिरप खरेदी करावीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व दवाखाने, जिल्हा आरोग्य विभाग, औषध वितरण केंद्रे, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये तातडीने करावी, असे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशात नऊ बालकांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत नऊ बालकांचा मूत्रपिंडे निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता. सुरुवातीला केवळ तापाच्या साथीमुळे झाल्याचे मानले जात होते. परंतु वैद्यकीय तपासणीत या मृत्यूंचे संभाव्य कारण म्हणून कफ सिरप समोर आले आहे. ही सर्व मुले पाच वर्षांखालील होती आणि त्यांना दिलेल्या औषधांमध्ये खोकल्याच्या औषधांचा समावेश होता. हे औषध घेतल्यानंतर मुलांच्या लघवीचे प्रमाण अचानक कमी झाले आणि मुत्रपिंडांमध्ये संसर्ग वाढला. यामुळे अखेर त्यांचा जीव गेला.