लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मेट्रोचे विस्तारित मार्ग सुरू करण्याचा १ मे रोजीचा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकला आहे. आता महामेट्रोकडून दोन्ही विस्तारित मार्गांवरील काम पूर्ण करण्यात आले आहे. या दोन्ही विस्तारित मार्गांची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी सुरू असून, आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्यानंतर या मार्गांवर सेवा सुरू होईल, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.
सध्या मेट्रोची सेवा दोन मार्गांवर सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे एकूण १२ किलोमीटरचे दोन मार्ग ६ मार्च २०२२ रोजी प्रवाशांसाठी सुरू झाले. त्यानंतर फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक या एकूण १२ किलोमीटरच्या विस्तारित मार्गांचे काम पूर्ण झाले आहे.
आणखी वाचा-मार्केट यार्डात टेम्पोच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू
नवीन विस्तारित मार्गांवर मेट्रोची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली आहे. या मार्गांची तपासणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि त्यांच्या पथकाकडून सुरू आहे. या दोन्ही मार्गांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर ५ ते ६ दिवसांत याबाबतचा अंतिम अहवाल महामेट्रोला मिळेल. आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्यास हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर विस्तारित मार्गावरील सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल. विस्तारित सेवेच्या उद्घाटनाचा मुहूर्तही राज्य सरकारच ठरवणार असल्याचे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले.
तपासणी नेमकी कशाची?
-मेट्रो मार्ग
-ओव्हरहेड केबल
-सिग्नल यंत्रणा
-मेट्रोच्या डब्यांची देखभाल व दुरुस्ती
-अग्निशमन यंत्रणा
-स्थानके आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना
मेट्रोचे विस्तारित मार्ग
१. गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानक
अंतर – ५.१२ किलोमीटर
स्थानके – गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महापालिका, जिल्हा न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल
२. फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय
अंतर – ८ किलोमीटर
स्थानके – फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय