पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुरक्षा व दक्षता विभागात लवकरच भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पद रिक्त असून, या नियुक्तीमुळे एसटी प्रवाशांच्या सुरक्षितेत वाढ होऊन विश्वास वाढेल, असा दावा महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

स्वारगेट बस स्थानकात फेब्रुवारी महिन्यात महिला अत्याचाराच्या प्रकणानंतर राज्यभरात याचे पडसाद पडले होते. एसटीला लवकर आय़पीएस दर्जाचा अधिकारी देण्यात येईल, असे आश्वासन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले होते. यानुसार गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच आयपीएस दर्जाच्या अधिकारी पदाला मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच एसटीच्या सुरक्षा विभागात या पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

एसटी महामंडळात राज्यभरातून दररोज लाखो प्रवाशांना सेवा पुरवते. मात्र, गेल्या काही वर्षांत आगार आणि स्थानकांमध्ये प्रवाशांसोबत होणारे गैरव्यवहार, सामान, वस्तूंची चोरी, स्थानकातील मालमत्तेची तोडफोड प्रामुख्याने महिलांची छेडछाड आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे सुरक्षा विभागाची जबाबदारी महत्त्वाची होती. गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षा आणि दक्षता विभागातील हे पद रिक्त असून, संबंधित आगारप्रमुख आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर स्थानकात खासगी सुरक्षारक्षकांच्या माध्यमातून सुरक्षितता पुरवली जात होती. स्वारगेट येथील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर एसटीने सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली, सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि गस्तही वाढवली. पण, विभागप्रमुख नसल्याने निर्णय प्रक्रिया मंदावली होती. आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्तीमुळे हे दोष दूर होतील, असा दावा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यानी केला.

या नियुक्तीमुळे एसटीच्या सुरक्षा विभागात गती आणि सुरक्षितता प्राप्त होणार आहे. आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीपीएस ट्रॅकिंग, तात्काळ प्रतिसाद पथके आणि महिलांसाठी विशेष मदत कक्ष स्थापन करून प्रवाशांचा विश्वास दृढ करण्यात येणार आहे. तसेच, तक्रारींचा वेळेवर निपटारा होईल. सुरक्षारक्षकांमधील शिस्तीचा अभाव दूर होईल. तसेच, महामंडळाच्या इतर विभागांशी समन्वय वाढेल, ज्यामुळे एकूण कार्यक्षमता सुधारेल, असेही सरनाईक यांनी नमूद केले.

सुरक्षिततेसाठी आणखी उपाय

– आगार, स्थानकातील मालमत्तेपासून प्रवाशांची सुरक्षितता निश्चित होणार

– तक्रारींचा वेळेत निपटारा होण्यास मदत होणार

– महिलांसाठी स्वतंत्र मदत कक्ष, निगराणी कक्ष स्थापना करण्यात येणार

– राज्यभरातील स्थानकांवर एकाच ठिकाणावरून नियंत्रण

– ई-बस आणि स्मार्ट सिक्युरीटी यांची माहिती वेळोवेळी कार्यान्वित

– पॅनिक बटन किंवा अतिसंवेदनशील काळात तत्पर मदत मिळणार

प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. ही नियुक्ती त्या दिशेने मोठे पाऊल आहे. या निर्णयाने केवळ सुरक्षितता नाही, तर त्याबरोबर महामंडळावरील विश्वासार्हता, वाहतूक सेवा आणि कारभारात गती येऊन नवसंजीवनी मिळेल.- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री