इंदापूर : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लढत देऊन तिरंगी लढत लक्षवेधी केलेले पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे माजी सभापती व सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना प्रवीण माने यांनी निकराची लढत देऊन अटीतटीच्या निवडणुकीत अडोतीस हजार मते मिळवून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील आपणही सक्षम उमेदवार असल्याचे स्पष्ट करून दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवीण माने यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ होती. अन्य बलाढ्य पक्ष व बलाढ्य उमेदवार समोर असताना प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार करून तो पूर्णही केला. तत्पूर्वी श्री. माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, ऐनवेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला व त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रवीण माने नाराज होऊन त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी इंदापुरात परिवर्तन मेळाव्याचे आयोजनही केले होते. या मेळाव्याला लोकांनाही उत्स्फूर्त प्रतिसादही दिला होता.

मात्र, या मेळाव्यात स्थापन झालेल्या तिसऱ्या आघाडीत ऐनवेळी फूट पडून काही जण त्यातून बाहेर पडले. तरीही तरुण सहकार्यांना बरोबर घेऊन प्रवीण माने यांनी ‘अकेला चलो रे’ हा मूलमंत्र स्विकारून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. विधानसभेला नवखे असले तरी प्रचारामध्ये आघाडी घेत प्रवीण माने यांनी इंदापूर तालुका अक्षरशः पिंजून काढला होता.त्या दरम्यानच हर्षवर्धन पाटील यांनीही स्वतःचा लवाजमा उभा करून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची ताकद घेत भरणे व माने यांना निकराची झुंज दिली. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधी असलेल्या मतांमध्ये मोठे विभाजन होऊन माने यांना अडोतीस हजार व श्री. पाटील यांना सत्यांण्णव हजार असे मते मिळाली होती .भरणे यांनी एक लाख वीस हजार मते मिळवून तिसऱ्यांदा विजय मिळवला.

आज ही इंदापूर तालुक्यात भरणे यांच्या विरोधात सुमारे दीड लाख मतदान झाले असतानाही मताच्या विभाजनाचा व गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर भरणे यांनी विजयाची हॅट्रिक केली होती .तसेच हर्षवर्धन पाटील यांनाही तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला तुलने मध्ये विधानसभा निवडणुकीत नवखे असलेले प्रवीण माने अडोतीस हजार मतांमध्ये समाधानी राहिले. कोणत्याही पक्षाची ताकद नसताना ज्येष्ठ अनुभवी नेतेगण सोबत नसतानाही प्रवीण माने यांनी मिळवलेली अडोतीस हजार मते तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरली .

मात्र राज्यांमध्ये पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होऊन भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर श्री. प्रवीण माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन सत्कार केला. यावेळी त्याची काही मुद्द्यावर चर्चाही झाली .मात्र त्याचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. आज प्रवीण माने आपल्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आगामी जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोणता निर्णय घेतात याकडे तालुक्याचे लक्ष वेधले असतानाच मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची त्यांनी घेतलेली भेट बरेच काही सांगून जात असून, माने हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट होत आहे.

सोनाई उद्योग समूहाच्या रूपाने माने कुटुंब हे राज्यभर दुग्ध व्यवसायामध्ये परिचित असून प्रवीण माने यांचे वडील दशरथ माने यांनीही जिल्हा परिषदेमध्ये पशुसंवर्धन खात्याचा कार्यभार सांभाळलेला असून कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे ही ते सभापतीही होते. राज्यस्तरीय रेखा समितीचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले असून परिसरामध्ये दशरथ माने यांच्या कामाचा मोठा डोलारा उभा असल्याने व विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जोडलेला कार्यकर्ता कोणत्याही कामापासून वंचित राहू नये .त्यामुळे माने लवकरच सत्तेच्या प्रवाहात सहभागी होऊन आपल्या कार्यकर्त्याच्या संचाला बळ देण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is praveen mane from indapur going to join bjp pune print news mrj