पुणे : ‘कोथरूड गोळीबार प्रकरणात ‘मकोका’ कारवाई केल्यानंतर परदेशात पसार झालेला गुंड नीलेश घायवळचे पारपत्र रद्द करण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी दिली. घायवळने बनावट कागदपत्रे, माहितीच्या आधारे पारपत्र मिळविल्याचे तपासात उघड झाले आहे. पुण्यातील प्रादेशिक पारपत्र विभागातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळ परदेशात पसार झाला. घायवळने पारपत्र मिळवण्यसाठी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे अहिल्यानगर पोलिसांकडे सादर करून त्याने तत्काळ पारपत्र मिळविले.
कोथरूड गोळीबार प्रकरणात घायवळसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली. पण, घायवळ ११ सप्टेंबरपासून परदेशात असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी घायवळविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. त्या वेळी न्यायालायने त्याला अटी, शर्तींवर जामीन मंजूर केला होता. त्या वेळी घायवळला पारपत्र पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
‘घायवळने परदेशात जाण्यासाठी पारपत्र कसे मिळवले, या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पारपत्र काढताना त्याने ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव असलेली कागदपत्रे सादर केली. त्याने अहिल्यानगरमधील पत्त्याचा वापर करून पारपत्र काढले. पुणे पोलिसांनी तेथे छापा टाकला. मात्र, घायवळने पारपत्र मिळविण्यासाठी दिलेला पत्ता खोटा असल्याचे उघडकीस आले,’ अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती
घायवळने पारपत्र काढताना अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिले होते. या प्रतिज्ञापत्रात त्याने आपल्याविरुद्ध राज्य, तसेच परराज्यात कोठेही गुन्हा दाखल नाही, असे म्हटले होते. प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी घायवळविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
नोटिशीला उत्तर नाही!
घायवळने ‘तत्काळ’ पारपत्र काढले होते. पारपत्र मिळाल्यानंतर घायवळने दिलेल्या पत्यावर तो वास्तव्य करत नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी याबाबतची पडताळणी करून तसा शेराही दिला होता. पोलीस पडताळणी न झाल्याने पारपत्र कार्यालयाने घायवळला नोटीस बजाविली. मात्र, त्याने नोटिशीला उत्तर दिले नाही.