पुणे : ‘भाषा ही केवळ व्यक्त होण्याचे माध्यम नसते. भाषेतून सामाजिक-राजकीय संकेत दिले जातात. अनेक ठिकाणी वेगवेगळे सामाजिक संदर्भ, स्थानिक लोक-व्यवहार घडत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोकभाषेतूनच शिकवायला हवे,’ असे मत ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. रमेश वरखेडे यांनी गुरुवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते डॉ. रमेश वरखेडे यांना ‘गं. ना. जोगळेकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. वरखेडे यांनी भाषा-साहित्य-संस्कृतीच्या व्यवहारावर भाष्य केले. साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, उज्वला जोगळेकर या वेळी उपस्थित होते.
डॉ. वरखेडे म्हणाले, ‘वेगवेगळ्या समुदायाचे वेगवेगळे लोकव्यवहार त्या-त्या स्थानिक पातळीवर घडत असतात. त्यातून त्या-त्या समुदायाची एक लोकभाषा तयार होते. लोकसंस्कृतीचे अनेक व्यवहार त्याच भाषेतून विद्यार्थ्यांना समजतात. त्यांच्या जडणघडणीवर या लोकव्यवहारांचेे संस्कार अगदी सुरुवातीपासूनच होत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या लोकभाषा, संस्कृती आणि त्यांचे स्थानिक साहित्य शिकवायला हवे. त्यांना लोकसंस्कृती वाचता यायला हवी.’
‘शब्दांच्या पाठीमागे अनेक अर्थ असतात. त्यात दडलेले संकेत असतात. एकाच अर्थाचे अनेक शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरावे लागतात. वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी शब्दांची योजना महत्त्वाची असते. त्यामुळे विद्यार्थ्याकडे केवळ शब्दांचा संग्रह असून चालत नाही. त्याला शब्दांची योजनाही कळायला हवी. विद्यार्थ्यांना शब्द योजनेचे धडेच द्यायला हवेत,’ असेही डॉ. वरखेडे यांनी नमूद केले.
डॉ. मोरे म्हणाले, ‘संस्थात्मक काम उभारणे अवघड असते. संस्था चालवताना अनेकांचे हितसंबंध जोपासावे लागतात. वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांना एकत्र आणून काम करावे लागते. डॉ. वरखेडे यांचा अभ्यास आणि व्यासंग मोठा आहे. मात्र, ते केवळ अभ्यास करून थांबले नाहीत, त्यांनी भाषा-संस्कृती-साहित्याच्या क्षेत्रात संस्थात्मक काम उभारले.’
प्रा. जोशी म्हणाले,‘वैचारिक मोकळेपणा आपल्या समाज जीवनातून हद्दपार झालेला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार सुरू आहे. प्राध्यापकांचा ऱ्हास होतो आहे. पूर्वी प्राध्यापकांच्या नावाने विद्यापीठे ओळखली जायची. मात्र, आज तो सुवर्णकाळ हरवतो आहे.’ अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.