पुणे : जुन्नर परिसरात बिबट्यांची दहशत सुरू आहे. शिरूरमध्ये १३ वर्षीय राहुल बोंबेची बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला, ही घटना ताजी असताना आणखी एक मुलगा थोडक्यात बचावला आहे. सुदैवाने तो सुखरूप आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे एक मुलगा घराच्या अंगणात झोका खेळणारा मुलगा बिबट्याचा हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे.
मुलगा घराच्या अंगणात मोबाईल बघत झोका खेळत होता. तिसरा झोका घेऊन तो मोबाईल बघत झोक्यावरच थांबला. तेवढ्यात घराच्या अंगणात कुत्रा धावत आला. त्याच्या पाठीमागे बिबट्या लागला होता. परंतु, कुत्रा घरात शिरल्याने बिबट्या पुढे गेला नाही. अचानक मुलाच लक्ष घटनेकडे गेलं. त्याने क्षणाचा विलंब न करता थेट घरात पळाला. मुलाने आरडाओरडा केला. तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली. घरातील सर्व कुटुंबीय बाहेर आले, तोपर्यंत बिबट्या निघून गेला होता. मुलाने प्रसंवधान दाखवल्याने मुलाचा जीव थोडक्यात बचावला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
शिरूरमध्ये नुकतंच दोन बिबट्यांना वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केलं आहे. एका बिबट्याला शार्प शूटरने ठार केले आहे. जुन्नर आणि शिरूरच्या पिंपरखेड परिसरात बिबट्याची अजूनही दहशत आहे. एक महिन्यात बिबट्याचा हल्ल्यात तिघांचा मृत्यू झालेला आहे. नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. लवकरात लवकर बिबट्यांना जेरबंद करण्यात यावं अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. पिंपरखेड परिसरात ३० पेक्षा अधिक पिंजरे लावण्यात आले आहेत. आणखी काही बिबटे पिंजऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
