पुणे : जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर खेडसह दौंड तालुक्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिबट्यांच्या नसबंदीचा आणि त्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असून, ऊसशेती आणि मानवी वस्त्यांमध्ये वावर असलेल्या बिबट्यांना पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४० कोटींची साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.

उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती अजित पवार यांनी दिली. खासदार डाॅ. अमोल कोल्हे, आमदार बापू पठारे, शरद सोनावणे, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर कटके, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, वनसंरक्षक अधिकारी आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि महादेव मोहिते यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करताना अजित पवार यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिबट्यांची नसबंदी करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना यादव यांनी अजित पवार यांना केली. त्यादृष्टीने हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. तसेच, गुजरात राज्यातील ‘वनतारा’ प्रकल्पामध्ये सुमारे ५० बिबटे पाठविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. ऊसशेती आणि मानवी वस्त्यांमधील बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढल्यामुळे बिबट्यांना पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात येणार आहे. त्यानुसार १२५ बिबटे पकडण्यात येणार असून त्यासाठी निधी देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविली असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड आणि दौंड तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले आणि पारनेर तालुक्यांमध्ये दिवसा वीजपुरवठा करण्यासंदर्भातील सूचनाही महावितरणला करण्यात आली. त्यादृष्टीने महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोकेश चंद्रा यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. त्यासाठी आवश्यक उपकरणे घेण्यात येणार असून, येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.