local body election 2025 पुणे : ‘लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आघाडी करून लढविल्याने अनेक मतदारसंघांतून काँग्रेसचे ‘पंजा’ चिन्ह गायब झाले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून घेतला जाईल,’ असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा संकेत शनिवारी दिला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले या वेळी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, ‘आघाडी करून निवडणूक लढविताना मोठ्या प्रमाणात नुकसान होते. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत वेगळी गणिते असतात. आघाडीत निवडणूक लढविल्याने पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज होतात. यापूर्वी आघाडीच्या माध्यमातून लढविलेल्या निवडणुकांमध्ये सक्षम उमेदवार असतानाही जागावाटपात दुसऱ्या पक्षाच्या वाट्याला जागा गेल्याने अनेक भागांतून काँग्रेसचे ‘पंजा’ चिन्ह गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष हे निर्णय घेणार आहेत.’ ‘काँग्रेस हा आतापर्यंत ‘मास बेस’ पक्ष राहिला होता. आता काँग्रेसला ‘केडर बेस’ पक्ष करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,’ असेही सपकाळ म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘हिटलर’ हा आदर्श
‘काँग्रेस पक्षाची विचारधारा करुणा, समतेच्या विचारांना धरून आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आदर्श हा ‘हिटलर’ आहे. समता नाकारणारी मनुस्मृती त्यांना महत्त्वाची वाटते,’ अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला वैचारिक पातळीवर कायम विरोध करणारा काँग्रेस हा एकमेव देशव्यापी राजकीय पक्ष आहे,’ असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ वर्षे पूर्ण केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले आहेत. फडणवीस हे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यामुळे रेशीमबागेचे वारे त्यांच्या कानावर लवकर येते. तिथून त्यांना मोदी यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचे संकेत आले आहेत. मोदी यांच्यानंतर आपणच पंतप्रधान, असे स्वप्न फडणवीस यांना पडत आहे.’
‘मनुस्मृतीचे दहन करून संविधान स्वीकारावे’
‘यंदा २ ऑक्टोबरला म्हणजेच गांधी जयंतीदिनी आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १००वा वर्धापनदिन आहे. हा संकेत संघाने समजून घ्यावा. तसेच १०० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनुस्मृतीचे दहन करून संविधान अंगीकारावे, असे आवाहन सपकाळ यांनी केले. ‘युवक काँग्रेसचे पदाधिकारी २ ऑक्टोबरला नागपूर येथे रेशीमबागेत जाऊन संविधानाची प्रत त्यांनी भेट देणार आहेत,’ असेही सपकाळ यांनी सांगितले.