पुणे : लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेने होऊन पुढील तीन दिवसांत मध्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस संपूर्ण कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवर पावसाचा जोर जास्त राहील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात बुधवारी (९ ऑक्टोबर) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याची वाटचाल वायव्य दिशेने होणार असून, पुढील तीन दिवसांत त्याची तीव्रता वाढून मध्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात त्याचे रुपांतर होण्याचा अंदाज आहे. तसेच मुंबईपासून केरळपर्यंतच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त वारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस संपूर्ण किनारपट्टी, पश्चिम घाट आणि पश्चिम घाटाला लागून असलेल्या मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : कुरिअरच्या डिलिव्हरीवरून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

दरम्यान, अरबी समुद्रातील नव्या प्रणालीमुळे आणि बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवरून राज्यात येत असल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास रखडण्याचा अंदाज आहे. परतीच्या प्रवासाला प्रतिकूल स्थिती निर्माण झाली आहे. किनारपट्टीवर शनिवारपर्यंत पावसाचा जोर जास्त राहील. शनिवारनंतर पावसाचा जोर कमी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low pressure area arabian sea chances of heavy rainfall coastal area western ghat and maharashtra pune print news dbj 20 css