पुणे : सुंदर निसर्ग, लालचुटुक स्ट्रॉबेरी, विपुल जैवविविधतेसाठी ओळख असलेला महाबळेश्वर, पाचगणी परिसर आता जागतिक नकाशावर स्थान मिळवणार आहे. युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर, पाचगणीने स्थान मिळवले असून, या यादीत देशातील अन्य सहा ठिकाणांचाही या यादीत समावेश आहे.

‘युनेस्को’च्या भारतातील स्थायी समितीने याबाबतची प्रसिद्धिपत्रकाद्वारेे घोषणा केली. महाबळेश्वर, पाचगणी हे केंद्र सरकारने १९८५मध्ये घोषित केलेल्या कोयना अभयारण्याचा भाग आहेत. त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत हा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. तसेच, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने या परिसराला भूवारसा स्थळ (जिओ हेरिटेज साइट) म्हणून मान्यता दिली आहे. या परिसरात प्राणी, पक्ष्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती, संकटग्रस्त प्रजाती आढळतात. हा परिसर भारतातील चार प्रमुख जैवविविधता ‘हॉट स्पॉट’पैकी एक असलेल्या पश्चिम घाटाचा भाग आहे.

‘पाचगणी आणि महाबळेश्वर येथील दख्खन ट्रॅप्स हे जगातील सर्वांत महत्त्वाच्या बॅसॉल्टिक ज्वालामुखी प्रदेशांपैकी एक मानले जातात. हे ठिकाण दख्खन ज्वालामुखी प्रदेशाचा भाग असून, ते सुमारे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी उदयास आले. फ्लड बॅसॉल्ट ज्वालामुखी या प्रकाराच्या अभ्यासासाठीचे हे आदर्श ठिकाण आहे. त्यामुळे या प्रदेशाला जागतिक स्तरावर भौगोलिक महत्त्व आहे. तसेच, हा भाग पृथ्वीच्या इतिहासातील सर्वांत नाट्यमय घटनांपैकी एक असलेल्या ‘क्रेटेशस–पेलिओजिन वंशविनाश’ घटनेशी थेट संबंधित असल्याचे मानले जाते.

या परिसरात सुस्थितीत जतन झालेली थरबद्ध रचना, लाव्हाच्या प्रवाहांचे थर, प्राचीन मृदा यामुळे पृथ्वीचा भूगर्भीय इतिहास शास्त्रज्ञांना सलग उपलब्ध होतो. प्राचीन काळापासून महाबळेश्वर हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे वैज्ञानिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक वारशाचे अनोखे मिश्रण या ठिकाणी दिसून येते. या सर्व कारणांमुळे महाबळेश्वर, पाचगणी हा दख्खन ट्रॅप प्रदेश ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीसाठी सक्षम दावेदार ठरू शकतो,’ असे युनेस्कोने संकेतस्थळावर नमूद केले आहे.

समितीने जाहीर केलेल्या देशातील अन्य ठिकाणांमध्ये उडुपी येथील सेंट मेरी बेटांचा भूगर्भीय वारसा, मेघालय येथील गुहा (पूर्व खासी टेकड्या), नागालँड येथील नागा हिल ओफिओलाइट, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम् येथील एरा मट्टी दिब्बालू, तिरुपती येथील तिरुमला टेकडीचा नैसर्गिक वारसा, केरळमधील वर्कला यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जागतिक वारसा यादीत अंतिम समावेश होण्यापूर्वी ठिकाणांचा तात्पुरत्या यादीत समावेश होणे बंधनकारक असते. त्यामुळे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या यादीत समावेश हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत समितीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे विशेष कौतुक केले आहे.

तात्पुरत्या यादीतील स्थळांची संख्या ६९वर

देशभरातील सात ठिकाणांच्या समावेशामुळे भारतातील जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीतील ठिकाणांची संख्या आता ६९वर पोहोचली आहे. त्यात ४९ सांस्कृतिक, ३ मिश्र आणि १७ नैसर्गिक वारसा स्थळांचा समावेश असल्याचेही युनेस्कोच्या भारतातील स्थायी समितीने स्पष्ट केले.