पुणे : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून १५ ऑगस्ट रोजी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठीचे शुल्क आणि पारितोषिकांची रक्कम ३० वर्षांनी वाढवण्यात आली आहे. आता प्रतिविद्यार्थी पाचऐवजी वीस रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार असून, पारितोषिकांच्या रकमेमध्ये जिल्हास्तरावरील एकूण रक्कम २२० रुपयांवरून ३ हजार ७५०, तर राज्यस्तरावर सहाशे रुपयांवरून १८ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
कला संचालनालयाकडून सन १९७२पासून शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते. कला शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या कला परिसंस्था व त्यातील अभ्यास पाठ्यक्रमांच्या संलग्नीकरणाच्या नियोजनासाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. प्रचलित बालचित्रकला स्पर्धेचे परीक्षा शुल्क आणि बक्षिसांच्या रकमा १९९४मध्ये ठरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यात बदल करण्यात आला नव्हता. आता बालचित्रकला स्पर्धेचे परीक्षा शुल्क आणि बक्षिसांच्या रक्कमांमध्ये सुधारणा करण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.
बालचित्रकला स्पर्धा १५ ऑगस्ट रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये, एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. गट-१ (इयत्ता पहिली व दुसरी), गट-२ (इयत्ता तिसरी व चौथी), गट-३ (इयत्ता पाचवी, सहावी व सातवी), गट-४ (इयत्ता आठवी, नववी व दहावी) या प्रमाणे चार गटांत स्पर्धा होणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन प्राथमिक, माध्यमिक उपसंचालक यांच्यामार्फत, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या http://www.msbae.ac.in या संकेतस्थळाद्वारे स्पर्धेत गटनिहाय सहभागी होणारी केंद्रे, शाळा आणि विद्यार्थ्यांची प्रवेशनोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावी लागणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण १४ नोव्हेंबर रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्याकडून करण्यात येणार आहे.
स्पर्धेकरिता चित्रांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवरील समितीकडून तीन सदस्यांची निवड समिती नियुक्त करण्यात येणार आहे. प्रत्येक गटासाठी चार बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील विजेत्याशिवाय पाच स्पर्धकांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.