MPCB Report in Pune:पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणेशोत्सवात यंदा शहरातील दोनशे गणेश मंडळाच्या ठिकाणी ध्वनीची पातळी तपासली. यात सर्वच मंडळांच्या ठिकाणी ध्वनीच्या मर्यादा पातळीचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काही ठिकाणी ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे आढळले, तर काही ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाची तपासणी आणि ते कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे पोलिसांना दिले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गणशोत्सवाच्या काळात शहरातील दोनशे गणेश मंडळांच्या ठिकाणी आवाजाची पातळी तपासली. त्यात सर्वच मंडळांच्या ठिकाणी ध्वनीच्या मर्यादा पातळीचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. काही गणेश मंडळांच्या ठिकाणी ध्वनीची पातळी जास्त नोंदविण्यात आली. त्यात जंगली महाराज रस्त्यावरील एका मंडळाने २८ ऑगस्टला ८७.७ डेसिबलची नोंद केली, तर सहकारनगरमधील एका मंडळाने १ सप्टेंबरला ९३.४ डेसिबलची नोंद केली. मात्र, शिवाजीनगरमधील जंगली महाराज चौकाजवळील मंडळाच्या ठिकाणी २७ ऑगस्टला ध्वनीची पातळी ७४.५ डेसिबल होती, ती कमी होऊन २८ ऑगस्टला ७१.१ डेसिबलवर आली.

शहरातील प्रमुख चौकांमध्येही ध्वनीच्या पातळीची नोंद घेण्यात आली. गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाबाबतचा सविस्तर अहवाल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला सादर केला जाणार आहे. यात गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या तुलनात्मक आकडेवारीचा समावेश असेल. यातून भविष्यात सण-उत्सव पर्यावरणाच्या नियमांनुसार साजरे करण्यासाठी धोरणे निश्चित करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वाढ कुठे?

रविवार पेठेतील सोन्या मारुती चौकात दिवसाच्या ध्वनी पातळीत ११ डेसिबलहून अधिक वाढ दिसून आली. लक्ष्मीनगर चौक आणि संत कबीर चौकातही दिवसाच्या ध्वनी पातळीत अनुक्रमे २.५८ डेसिबल आणि ५.६९ डेसिबलची वाढ नोंदवली गेली.

घट कुठे?

अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ध्वनी पातळीत घट झाली आहे. औंध-वाकड रस्त्यावरील ऋषी चौकात दिवसाची ध्वनी पातळी ११ डेसिबलहून अधिक कमी झाली आहे. त्याचप्रमाणे, जुना बाजार चौकात मागील वर्षाच्या तुलनेत रात्रीच्या ध्वनी पातळीत ६ डेसिबलहून अधिक घट झाली आहे.

संमिश्र स्थिती कुठे?

बाणेरमधील कस्तुरी सर्कल चौकासारख्या काही ठिकाणी संमिश्र कल दिसून आला. तेथे दिवसाची ध्वनी पातळी कमी झाली, परंतु रात्रीच्या वेळी त्यात वाढ झाली.

आवाजाची मर्यादा पातळी

विभाग – दिवसा – रात्री

औद्योगिक – ७५ – ७०

व्यावसायिक – ६५ – ५५

निवासी – ५५ – ४५

शांतता क्षेत्र – ५० – ४०

ध्वनीच्या पातळीचे निरीक्षण केवळ नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नसून, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीही आहे. सणांचा आनंद पर्यावरणाची जबाबदारी लक्षात घेऊन साजरा केला जावा, यासाठी निर्धारित ध्वनी मर्यादेचे पालन व्हावे, हा यामागील उद्देश होता.- कार्तिकेय लंगोटे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ