पुणे : शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपाची वीजजोडणी देण्यासाठी महावितरणच्या वतीने रास्तापेठ येथील कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विविध मंडळांकडून विजेच्या साहाय्याने देखावे सादर करण्यात येतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी करण्यात येते. या सर्व मंडळांना लवकरात लवकर वीजजोडणी उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणकडून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.
गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणी मिळवण्यासाठी महापालिका किंवा स्थानिक स्वराज संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, पोलीस परवानगी, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी अहवाल ही कागदपत्रे महावितरणच्या कार्यालयात जमा करावी लागणार आहेत. रास्तापेठ येथील महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्रात या मंडळांचे अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
मंडळांना या सुविधेचा लाभ घेता यावा, म्हणून अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश लोखंडे (संपर्क – ७८७५७६७४९४) यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात आल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
अनामत रक्कम ‘ऑनलाइन’
तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना अनामत रक्कम भरावी लागणार असून, ही रक्कम ‘ऑनलाइन’ पद्धतीने भरल्यास गणेशोत्सवानंतर लगेचच अनामत रकमेतून उरलेले पैसे मंडळांना परत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
गणेश मंडळांना आवाहन
गणेशोत्सव काळात दुर्घटना घडू नये, यासाठी मंडप, रोषणाई आणि देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इत्यादी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. तसेच मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी महावितरणच्या स्थानिक शाखा अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक नोंदवून ठेवावेत, असे आवाहन महावितरणकडून गणेश मंडळांना करण्यात आले आहे.
