पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोची केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या प्रमुखाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. त्याने दापोडी आणि कोथरूड येथे मेट्रोची केबल चोरी केल्याची कबुली दिली आहे. दिलशाद शामशाद अन्सारी (वय ३४, रा. खेकडा, बागपत, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी मेट्रो स्थानकाजवळ केबल वायर चोरीला गेल्या बाबत दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास केला असता एक व्यक्ती रात्रीच्या वेळी मेट्रो रेल्वे मार्गावर जाऊन तेथून तांब्याची वायर चोरी करत असल्याचे आढळले. संशयित व्यक्तीचा पाठलाग केला असता तो उत्तर प्रदेश मधील बागपत येथे असल्याचे आढळले. त्यानुसार त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली. त्याच्याकडून दापोडी मेट्रो स्थानक येथून चोरी केलेली दोन लाख रुपये किमतीची तीनशे मीटर तांब्याची वायर जप्त केली आहे. त्याने यापूर्वी कोथरूड मेट्रो स्थानकातून देखील तांब्याची वायर चोरी केली असल्याचे सांगितले.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आठ ते पंचवीस टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची ६३ लाख ९३ हजारांची फसवणूक करण्यात आली. या गुन्ह्यातील दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्यावरून एक कोटी १५ लाख रुपयांचा व्यवहार झाला असून त्याबाबत विविध राज्यातून दहा तक्रारी दाखल आहेत.
प्रथमेश शिवाजी भुसे (२३, लोहगाव. मूळ रा. अहिल्यानगर), सचिन राधाकिसन मोरे (३४, दिघी) अशी अटक केलेले आरोपींची नावे आहेत. खासगी कंपनीत लेखापाल म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची ६३ लाख ९३ हजार पाचशे रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी संबंधित व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आठ ते २५ टक्के नफा मिळेल असे आमिष दाखवले होते. त्यानंतर वेगवेगळ्या लिंक द्वारे शेअर खरेदी करण्यास सांगत त्यांची फसवणूक करण्यात आली. दरम्यान तक्रारदार व्यक्तीला त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर सात कोटी ५६ लाख ९१ हजार ४६० रुपये एवढा नफा जमा झाल्याचे दाखवण्यात आले.
या गुन्ह्याचा तपास करत असताना सायबर पोलिसांनी तक्रारदाराने पैसे पाठवलेल्या बँक खात्याची माहिती काढली. संबंधित बँक खाते एका प्रयोगशाळेच्या नावाने असून त्याची केवायसी प्रथमेशच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा आपल्या साथीदार सचिनसोबत मिळून केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सचिनला देखील ताब्यात घेतले. आरोपींनी तक्रारदाराकडून पैसे घेतल्यानंतर ते बँकेतून रोख स्वरूपात काढून त्याची विल्हेवाट लावली आहे. आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यावर एक कोटी १५ लाख ८५ हजार ७८९ रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्या बँक खात्यावर विविध राज्यातील एकूण दहा तक्रारी दाखल आहेत. सायबर पोलीस तपास करीत आहेत.
सोसायटीमधील सदस्यांच्या त्रासाला कंटाळून व्यक्तीचे आत्महत्या
गृहनिर्माण सोसायटी मधील सदस्यांनी वारंवार अपमानित करून मानसिक खच्चीकरण केल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना वडमुखवाडी येथे घडली.
कैलास विलास भोसले (४२, वडमुखवाडी, हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कैलास यांच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण कोलगे, विठ्ठल मारुती हरण यांना अटक केली असून इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांनी आरोपींना वेळोवेळी सोसायटीच्या कामकाजातील चुका निदर्शनास आणून दिल्या होत्या. तरी देखील आरोपींनी त्या चुका न सुधारता त्यांना वेळोवेळी अपमानित करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. या त्रासाला कंटाळून त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या बहाण्याने साडेतीन लाखांची फसवणूक
ब्लॉक ट्रेडिंग आणि आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तीन लाख ६७ हजारांची फसवणूक केल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली.
याबाबत ३५ वर्षीय युवकाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये ॲड केले. तिथे त्यांना ब्लॉक ट्रेडिंग आणि आयपीओबाबत माहिती दिली. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास खूप जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर एका संकेतस्थळावर त्यांचे खाते सुरू करण्यास सांगून त्यावरून तीन लाख ६७ हजार रुपये गुंतवणूक घेतली. गुंतवलेल्या रकमेवर नफा झाल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी करत त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
पाच लाखांचे दागिने लंपास
उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून पाच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना चिंचवडे नगर येथे घडली. याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर दगडू राजपूत (२७, चिंचवडे नगर) याला अटक केली आहे. आरोपी सागरने फिर्यादी यांच्या घरात उघड्या दरवाजा वाटे प्रवेश केला. घरातून पाच लाख एक हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्याने चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
दारू भट्टीवर छापा
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पठारे वस्ती येथे दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचे रसायन नष्ट केले.पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बेकायदेशीरपणे दारू तयार करण्यासाठी रसायन भिजत घातले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये दीड लाख रुपये किमतीचे तीन हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. चाकण पोलीस तपास करत आहेत.