पुणे : शिवाजीनगर ते लोणीकाळभोर आणि रेसकोर्स ते स्वारगेट या विस्तारित मेट्रो मार्गांच्या व्यवहार्यता अहवाल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सादर करण्यात आला आहे. याच मार्गांचे काम करण्यास महामेट्रोही इच्छुक आहे. त्यामुळे या मार्गांचे काम कोण करणार असा तिढा आता निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीएमआरडीएकडून टाटा समूहासोबत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम पीपीपी तत्वावर सुरू आहे. या पुणेरी मेट्रो प्रकल्पाचा शिवाजीनगर ते लोणीकाळभोर आणि रेसकोर्स ते स्वारगेट असा विस्तार करण्याचे नियोजन आहे. पीएमआरडीएने या मार्गांचा प्रकल्प विकास आराखडा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून तयार करून घेतला होता. याचवेळी महामेट्रोचा खडकवासला ते खराडी हा मार्ग प्रस्तावित आहे. त्यात खडकवासला ते स्वारगेट, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि हडपसर ते लोणी काळभोर या टप्प्यांचा समावेश आहे. महामेट्रोने या मार्गाचा प्रकल्प विकास आराखडा खासगी सल्लागार संस्थेकडून तयार करून घेतला होता. दोन्ही संस्थांनी महापालिकेकडे हे प्रकल्प विकास आराखडे सादर केले होते.

हेही वाचा…‘निवडणूक एकतर्फी कशी होते ते बघतोच मी’…वसंत मोरे यांचे विधान

पीएमआरडीए आणि महामेट्रो यांच्याकडून दोन समान मार्गांवर मेट्रो उभारणीचे प्रकल्प विकास आराखडे सादर केले. त्यामुळे एकच संस्था या मार्गांचे काम करेल हे निश्चित करण्यात आले. हे मार्ग फायदेशीर ठरतील की नाही, हे तपासण्यासाठी पीएमआरडीएने सल्लागार नेमण्याचे पाऊल उचलले आहे. सल्लागारांच्या अहवालात सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर हे मार्ग व्यवहार्य असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा अहवाल पीएमआरडीएकडून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणासमोर (पुमटा) नुकताच सादर करण्यात आला.

विस्तारित मार्ग कोण करणार, याचा निर्णय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पुमटाकडून घेतला जाणार आहे. सुरुवातीला हे मार्ग पीपीपी तत्वावर व्यवहार्य नसल्याचे पीएमआरडीएचे म्हणणे होते. आता सल्लागार संस्थेने हे मार्ग व्यवहार्य असल्याचे म्हटले आहे. यामुळे पीएमआरडीएने या मार्गांचा विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे. याचवेळी महामेट्रोनेही या विस्तारित मार्गांचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे पुमटाकडून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…विद्यापीठ चौकातील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना; गणेशखिंड रस्त्यावर अंशत: वाहतूक बदल

भविष्यात दोन्ही मेट्रो जोडणे अशक्य

महामेट्रोकडून ओव्हरहेड इक्विपमेंट प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मेट्रो गाड्यांचा वर असलेल्या तारांच्या जाळ्यातून वीज मिळून त्या धावतात. याचवेळी पुणेरी मेट्रोमध्ये थर्ड रेल प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. या प्रणालीत मेट्रो गाड्यांना रुळाखालून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. एकाच शहरात दोन वेगवेगळ्या प्रणालीवर मेट्रो चालविण्याचा प्रयोग फक्त पुण्यात या निमित्ताने झाला आहे. मेट्रोचा विस्तार भविष्यात झाला तरी यापैकी एकाच प्रणालीचा वापर करावा लागणार आहे. महामेट्रोने विस्तार केल्यास ओव्हरहेड प्रणाली आणि पुणेरी मेट्रोने विस्तार केल्यास थर्ड रेल प्रणाली यांचाच वापर करणे त्यांच्यासाठी बंधनकारक असेल. यामुळे भविष्यात या दोन्ही मेट्रो एकमेकांशी जोडणे शक्य नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro line extensions in pune pmrda and mahametro clash over project responsibility pune print news stj 05 psg
First published on: 21-03-2024 at 14:24 IST