Rohit Pawar On Bapusaheb Pathare : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील लोहगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बापूसाहेब पठारे यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. शनिवारी रात्री उशीरा हा प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे वडगावशेरी मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘एखाद्या लोकप्रतिनिधीला धक्काबुक्की होत असेल तर तिथं सामान्य माणसाचं काय?’, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवारांनी काय म्हटलं?
“पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध!लोकप्रतिनिधीला धक्काबुक्की होत असेल तर तिथं सामान्य माणसाचं काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध! लोकप्रतिनिधीला धक्काबुक्की होत असेल तर तिथं सामान्य माणसाचं काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 5, 2025
नेमकं काय घडलं?
आमदार बापूसाहेब पठारे यांना लोहगावमध्ये शनिवारी रात्री मारहाण करण्यात आल्याची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. बापूसाहेब पठारे हे शनिवारी संध्याकाळी लोहगाव परिसरातील एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या काही कार्यकर्त्यांबरोबर वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या वादाचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं. आमदार पठारे यांना काही लोकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंचर तणावाची परिस्थिती कमी झाली.