अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचं (नैऋत्य मोसमी वारे) अंदमान समुद्र, निकोबार बेटासंह बंगलाच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात सोमवारी आगमन होण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तासांत मोसमी पाऊस अंदमानात दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, केरळ किनारपट्टीवर पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मोसमी पावसाची प्रगती वेगाने होत असून मोसमी पाऊस चोवीस तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या दक्षिण भारतामध्ये मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील काही जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मान्सून अंदमानच्या दिशेने निघाल्याने दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळात अतिवृष्टी सुरू असून आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असून तेथील कमाल तापमानाचा पारा ४५ ते ४९ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअस असल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली.

विषुववृत्तीय भागाकडून बंगालचा उपसागर आणि अंदमानाच्या समुद्राकडे जोरदार उष्ण प्रवाह वाहत आहेत. त्यामुळेच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सरासरीच्या वेळेआधी तीन ते चार दिवस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र आणि निकोबार नैर्ऋत्य मोसमी वारे २० ते २२ मेच्या आसपास दाखल होत असतात. मात्र, अनुकूल स्थितीमुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे. अशीच स्थिती पुढील काही दिवस राहिली, तर केरळच्या किनारपट्टीवर देखील वेळेच्या आधी नैर्ऋत्य मोसमी वारे दाखल होण्याची चिन्हे आहेत.

या जिल्ह्यांना इशारा
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना १६ ते १९ मे पर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा (येलो ॲलर्ट ) हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon arrived in andman heavy rainfall possibilities in 9 districts of maharashtra weather live update pune print news rmm
First published on: 15-05-2022 at 21:41 IST