पुणे : वेदांता फॉक्सकॉन हा उद्योग राज्यातून गुजरातला गेल्याचा विषय ताजा असतानाच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान औद्योगिक गुंतवणूक मिळवण्यासाठी पुण्यात आले. पुण्यातील उद्योगांचे  प्रतिनिधी, विविध देशांचे वाणिज्य राजदूत यांच्याशी संवाद साधून मध्य प्रदेश सरकारकडून उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती देत चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये गुंतवणुकीचे आवाहनही केले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

मध्यप्रदेश इंडस्ट्रीयल डेव्हलमेंट कॉर्पोरेशन आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्यातर्फे विमाननगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये इन्व्हेस्ट इन मध्य प्रदेश हा कार्यक्रम झाला. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष सुधीर मेहता, संजय कुमार शुक्ला यांच्यासह काही देशांचे वाणिज्य राजदूतही या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा : मुळशी-मुंबई मार्गाचे काम एक महिन्यात मार्गी लागणार ; उच्च न्यायालयाची भूसंपादनाला परवानगी

चौहान म्हणाले, मध्यप्रदेश हे भारताचे हृदय आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असलेले राज्य आहे. मध्य प्रदेशचा विकासदर १९.७६ टक्के आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचा वाटा ४.६ टक्के आहे. देशात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशमध्ये होते. रासायनिक शेती सोडून आता सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळत आहेत.  कृषि उत्पादनाच्या आघाडीवर मध्य प्रदेश दमदार कामगिरी करत आहे. मात्र आता औद्योगिक गुंतवणूक मिळवण्यासाठी सातत्याने गुंतवणूक परिषदा आयोजित केल्या जात आहेत. औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग, खणीकर्म, माहिती तंत्रज्ञान, इथेनॉल निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रांवर मध्य प्रदेश प्रदेशचा भर आहे. प्रत्येक क्षेत्रासाठीचे स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. उद्योगांना गुंतवणुकीसाठी जे वातावरण हवे, ते मध्य प्रदेशात आहे.मध्यप्रदेशात गुंतवणूक केलेल्या काही उद्योजकांनी त्यांचे अनुभव सांगितले. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या तरी सरकारने तातडीने प्रतिसाद देऊन त्या मार्गी लावल्याचा अनुभव सांगण्यात आला. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp cm shivraj singh chauhan campaign in pune for investments in madhya pradesh pune print news tmb 01