पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ ही परीक्षा २८ सप्टेंबर रोजी राज्यभरातील जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ‘एमपीएससी’ने घेतला असून, आता ही परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘एमपीएससी’ने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परीक्षेच्या जाहिरातीनुसार, परीक्षा दिनांक २८ सप्टेंबर रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांतील गावांचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच, राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून, अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने २६ सप्टेंबर रोजी ‘एमपीएससी’ला परीक्षा पुढे ढकलण्याची पत्राद्वारे विनंती केली होती. ही विनंती ‘एमपीएससी’ने मान्य केली आहे. त्यानुसार परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे,’ असे परिपत्रकात म्हटले आहे.
‘एमपीएससी’च्या नव्या निर्णयानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ आता ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणाऱ्या पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ चा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही ‘एमपीएससी’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.