Murlidhar Mohol on Jain Boarding Land Case: पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणाचा वादग्रस्त व्यवहार रद्द करण्याचा निकाल आज धर्मादाय आयुक्तांनी दिला आणि गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरून चालू असलेल्या वादावर पडदा पडला. मात्र, हा पडदा तात्पुरता असल्याचंच पुण्यातील खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विधानावरून सूचित होत आहे. धर्मादाय आयुक्तांनी आज दिलेल्या निकालावर मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं. यावेळी एकीकडे झालेला निर्णय चांगला झाल्याचं सांगतानाच मोहोळ यांनी येत्या काळात या प्रकरणात नेमकं काय काय घडलं, हे सगळं मी सांगणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

पुण्यातील जैन बोर्डिंगची जमीन विकसित करण्यासाठी गोखले बिल्डर्सना विकल्याची बाब उघड झाल्यानंतर त्यावरून मोठा गदारोळ झाला. बोर्डिंग ट्रस्टच्या नियमात ही जमीन विकता येणार नाही असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, तरीदेखील जमिनीचा व्यवहार झाल्याचं समोर आलं. त्यानंतर यावरून राजकीय वाद सुरू झाला. या व्यवहारात मुरलीधर मोहोळ सहभागी असल्याचा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. कालांतराने त्यात जैन समाजदेखील उतरला. अखेर मोठ्या घडामोडींनंतर शेवटी ३० ऑक्टोबर रोजी धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द झाल्याचा निकाल दिला.

काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?

या प्रकरणात पक्षातूनच मुरलीधर मोहोळ यांना अडकवण्याचे प्रयत्न होत असल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र, आपला पक्ष, कार्यकर्ते आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितलं. तसेच, राजकीय आरोप झाले असले, तरी जैन समाजाने कधीही आरोप केले नसल्याचंही ते म्हणाले. “पहिल्या दिवसापासून पुण्यातल्या जैन बांधवांनी व्यक्तिगत स्वरूपात माझं कधीच नाव घेतलं नाही. कारण त्यांनाही माहिती होतं की यात वास्तव काय आहे. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. आता मला त्यावर बोलायचं नाही. पण आज झालेला निर्णय ही सगळ्यांसाठीच अत्यंत समाधानाची बाब आहे”, असं मोहोळ म्हणाले.

कधीतरी सविस्तर बोलेन – मुरलीधर मोहोळ

दरम्यान, धर्मादाय आयुक्तांचा निकाल आला असला, तरी या प्रकरणातलं राजकीय वादळ अद्याप बाकी असल्याचंच मोहोळ यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे. “मी यावर येत्या काळात सविस्तर एकदा बोलणार आहे. जमीन विकणारे ट्रस्टी, जमीन घेणारे गोखले बिल्डर्स आणि हा व्यवहार होऊ नये, समाजाला जागा राहावी म्हणून मागणी मांडणारा जैन समाज या तीन घटकांपुरताच हा विषय असताना त्यात काय काय झालं, किती राजकारण झालं, किती खालच्या पातळीवरचे आरोप झाले, याच्याशी काय काय जोडलं गेलं ते सगळं अत्यंत चुकीचं होतं. खूप वेदनादायी होतं. जैन समाजालाही यात कोणतंही राजकारण नको होतं. यात संघर्ष निर्माण झाला. इतर काही लोकांनी त्यात आपले स्वार्थ साधून घेतले”, असं ते म्हणाले.

“या व्यवहारात चुकीचं काय झालं असेल तर त्यात योग्य ती कारवाई होईलच. कुणाला काय कराचंय ते करू द्या. यात काही नव्हतं. जे होतं ते संपलंय. आता कुणाला हे पुढे वाढवायचंय किंवा कुठे न्यायचं हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे. मी त्यावर बोलणार नाही”, असंही मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर यांना उद्देशून म्हणाले.

“माझं नाव का घेतलं गेलं, आरोप का केले गेले यासंदर्भातली इत्थंभूत माहिती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय घडलं याची माहिती मी देणार आहे. वेळ येऊ द्या”, असं सूचक विधानही त्यांनी पत्रकार परिषदेत केलं.