विमाननगर भागात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका सराईताला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक कोटी सात लाख रुपयांची ७१४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले.
अरविंद रवींद्र बिऱ्हाडे (वय ३६, रा. अंमळनेर, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बिऱ्हाडे सराईत असून त्याच्या विरोधात मारामारी, बलात्कार, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. तो विमाननगर भागात अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून पकडण्यात आले.
बिऱ्हाडेकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याने अमली पदार्थ कोठून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव आदींनी ही कारवाई केली.