पुणे : अध्यापनात अभिनव पद्धतींचा वापर करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या दोन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. यंदा गडचिरोली जिल्ह्यातील मंताय्या बेडके, कोल्हापूर येथील सागर बगाडे राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ मध्ये पुरस्कारप्राप्त ठरलेल्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार देशभरातील ५० शिक्षक पुरस्कारप्राप्त ठरले आहेत. त्यात राज्यातील दोन शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – उच्चांकी दरानंतरही हळदीच्या लागवडीत घट, प्रतिकूल हवामानाचा हळदीवरील परिणाम काय ?
मंताय्या बेडके गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. ‘गेली १४ वर्षे संवेदनशील, दुर्गम भागात कार्यरत आहे. या काळात शाळेची पटसंख्या आठवरून १३८ पर्यंत वाढवण्यात यश मिळाले आहे. ग्रामीण दुर्गम भागात शाळा असूनही लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेत इनव्हर्टर, स्मार्ट टीव्ही अशा सुविधा विकसित केल्या आहेत. उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत आहे. राष्ट्रीय पुरस्काराच्या रुपाने माझ्या कामाची दखल शासकीय पातळीवर घेतली गेल्याचा आनंद आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – पुणे : पावसाची उघडीप, उन्हाचा चटका; जाणून घ्या, विभागनिहाय तापमान
तर सागर बगाडे कोल्हापूर येथील एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये गेली तीस वर्षे ते चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘विद्यार्थ्यांना घेऊन देशविदेशात कार्यक्रम केले आहेत. दोन विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे. दुर्गम भागातील मुले, शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची मुले यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. या पुरस्काराने जबाबदारी वाढल्याची भावना आहे. हा पुरस्कार मुलांना अर्पण करत आहे. कारण मुलांमुळेच मला शिकायला मिळाले. निवृत्त होत असताना पुरस्कार मिळाल्याने शेवट गोड झाल्यासारखे वाटते आहे,’ असे बगाडे यांनी सांगितले.