पुणे : हळदीला मागील हंगामात उच्चांकी दर मिळूनही प्रतिकूल हवामान, अतिउष्णता, अतिपावसामुळे देशभरात हळद लागवडीत सुमारे पाच हजार हेक्टरने घट झाली आहे. सततच्या पावसामुळे राज्यात हळदीचे कंद कुजू लागले आहेत. मागील वर्षी हळदीला उच्चांकी दर मिळाला होता. राजापुरी हळदीला सरासरी १६००० क्विंटल दर मिळाला होता. त्यामुळे राज्यासह देशात हळद लागवडीत मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्षात हळद लागवडीत घट झाली आहे. देशात मागील वर्षी सुमारे ३ लाख ५ हजार १८२ हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. यंदाच्या हंगामात हळदीची लागवड तीन लाख हेक्टरवरच स्थिरावली आहे.
हळदीची लागवड एक मे ते पाच जूनपर्यंत होते. हळद लागवडीच्या या काळात महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रमुख राज्यांत तापमान सरासरी ३७ ते ४० अंश सेल्सिअसवर होते. इतक्या तापमानात हळदीची लागवड केल्यास हळदीचे बियाणे उन्हामुळे होरपळून कुजते. त्यामुळे प्रमुख लागवड क्षेत्रात अपेक्षित लागवड झाली नाही. शिवाय चांगला दर मिळाल्यामुळे हळदीच्या बियाण्याचे दरही चढे होते. सरासरी तीन हजार रुपये क्विंटल असणारा दर सात हजार रुपये क्विंटलपर्यंत गेला होता. तसेच लागवडीनंतर संततधार पाऊस सुरू आहे. पावसाने उघडीप न दिल्यामुळे कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यातील हळदउत्पादक पट्ट्यात कंदकुज रोगामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पिंपरी : जावई चोरायचा दागिने आणि सासू करायची विक्री; ‘असे’ फुटले बिंग
राज्यातील क्षेत्र ६९,००० हेक्टरवर
राज्यातील हळद लागवडीला मोठा फटका बसला आहे. सन २०२२-२३ च्या हंगामात ७८,३०० हेक्टरवर लागवड झाली होती. २०२३-२४ मध्ये ८८,३७८ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदाच्या २०२४-२५ च्या हंगामात सुमारे ६९,००० हेक्टरवर लागवड झाली आहे. सांगली, सातारा, हिंगोली आणि वाशीम या प्रमुख हळद उत्पादक जिल्ह्यांत लागवडीला प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे.
हेही वाचा – पुणे : पावसाची उघडीप, उन्हाचा चटका; जाणून घ्या, विभागनिहाय तापमान
देशातील हळद लागवडीला प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे. हळद लागवडीचे चित्र सप्टेंबर महिन्यात स्पष्ट होऊन लागवडीची निश्चित आकडेवारी समोर येईल. महाराष्ट्रात लागवडीच्या काळात असलेली अतिउष्णता आणि सध्या पडत असलेल्या संततधार पावसामुळे हळदीचे कंद कुजू लागले आहेत. देशातील अन्य राज्यात मात्र पीक चांगले आहे, अशी माहिती कसबे डिग्रज (सांगली) येथील हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी दिली.