पुणे : ‘नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (एनएमआयएएल) केवळ मुंबईसाठी नाही, तर पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, साताऱ्यासाठी रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहेत,’ अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन बुधवारी (८ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
मोहोळ म्हणाले, ‘मुंबई विमानतळावरील गर्दीमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे ‘स्लाॅट’ मर्यादित आहेत. आता नवी मुंबई विमानतळामुळे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतील. प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल. पुणेकरांना या विमानतळामुळे दुहेरी लाभ मिळेल. विमानतळावर उभारण्यात आलेले अत्याधुनिक मालवाहतूक टर्मिनल वर्षाला सुमारे ३२ लाख टन माल हाताळण्यास सक्षम आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा आणि कृषी आधारित उद्योगांना निर्यातीस चालना मिळेल.’
‘नवी मुंबई विमानतळ ठाणे, भिवंडी आणि जेएनपीटी या बंदरांच्या जवळ असल्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्गे पुण्याहून थेट २.५ ते ३ तासांत पोहोचता येईल. त्यामुळे हवाई मालवाहतुकीचा कालावधी कमी होईल आणि निर्यात खर्चात घट होईल. या विमानतळामुळे पुण्या-मुंबईत नव्या औद्योगिक कॉरिडॉरचा विकास वेगाने होईल,’ असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
‘पुनावळे, किवळे, गहुंजे परिसराला महत्त्व’
‘तळेगाव आणि चाकण परिसरात अनेक बहुराष्ट्रीय उत्पादक कंपन्या, तसेच वाहन उद्योग आहेत. त्याचप्रमाणे हिंजवडी, मारुंजी परिसरात माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांची (आयटी) कार्यालये आहेत. या सर्व कंपन्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना विमानतळाचा फायदा होणार आहे. या विमानतळामुळे पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे, किवळे, गहुंजे परिसराला महत्त्व प्राप्त होणार आहे. तसेच दोन्ही महानगरपालिकांसह बारामती परिसरातील उद्योगव्यवसायांना चालना आणि निर्यातीसाठी पर्याय उपलब्ध होणार आहे,’ असेही मोहोळ यांनी सांगितले.