शरद पवार यांचा भाजपला सवाल  

पुणे :  नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी केली जाते. पण सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतल्याचे माझ्या पाहण्यात किंवा वाचनात आले नाही, अशी टिपणी शरद पवार यांनी शनिवारी केली. उद्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. तेच कदाचित त्याचा खुलासा करतील, असा टोलाही पवार यांनी लगावला.

नारायण राणे यांना एक न्याय आणि नवाब मलिक यांना दुसरा न्याय लावता, याचा अर्थ हे सगळे राजकीय हेतूने केले जात आहे, असेही पवार म्हणाले. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आणि राजकीय हेतूने कारवाई केली गेली आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न जाणूनबुजून केला जात आहे.

मात्र, या विरोधात आम्ही संघर्ष करत राहणार, असे पवार यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची भाजपची मागणी फेटाळून लावताना पवार म्हणाले, गेली २० वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. त्या सर्व काळात कधी असे चित्र दिसले नाही, आताच का दिसले?, असा सवाल पवार यांनी केला.

 एखादा मुस्लीम कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा जोडीदार ठरवायचं हे नवीन नाही. मलिक यांच्यावर विनाकारण हा आरोप केला जात आहे. कधी काळी माझ्यावरही असे आरोप झाले होते. हे लोक या पद्धतीनं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्याची चिंता करण्याचे कारण नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.