संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) वरीष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानच्या ‘पीआयओ’ला माहिती पुरविल्याच्या आरोपावरून एटीएसने त्यांना अटक केली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली. प्रदीप कुरुलकर यांच्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानचा एजंट कोण ‘आरएसएस’चा स्वयंसेवक, संस्कार भारती आणि ‘आरएसएस’ची हीच का शिकवण, अशा घोषणादेखील देण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची महापालिकेकडून अंमलबजावणी

प्रशांत जगताप म्हणाले की, विरोधी पक्षातील एखाद्या नेत्याने विधान केल्यावर सत्ताधारी भाजपाकडून त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते.पण मागील ४० वर्षांपासून डीआरडीओ या संस्थेवर विविध पदांवर शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांनी काम पाहिले आहे. पण आता याच व्यक्तीने पाकिस्तानला माहिती पुरविल्याचे समोर आले आहे. प्रदीप कुरुलकर यांनी आरएसएसमध्येदेखील विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे नेहमी इतरांना देश प्रेमाबद्दल आरएसएसकडून सांगितले जाते, पण याच शाखेतील व्यक्तीने देशातील माहिती पाकिस्तानला पुरविली. त्यामुळे आरएसएसमध्ये हेच शिकवले जाते का? त्यामुळे आम्हाला देश प्रेम आरएसएस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शिकवू नये. आमच्या रक्तात देश प्रेम असून देशद्रोही प्रदीप कुरुलकर यांच्यावर कठोर कारवाई केंद्र सरकारने कारवाई, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp protest in pune to demand action against drdo scientist pradeep kurulkar svk 88 ssb