लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यवळणाजवळ मध्यरात्री वऱ्हाडाच्या बसला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. बसला आग लागल्यानंतर ४२ प्रवासी तातडीने खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली. आगीत बस पूर्णपणे जळाली. द्रुतगती मार्गावरून मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस पुण्याकडे निघाली होती. खंडाळा घाटातील खोपोली बाह्यवळण परिसरात बसने अचानक पेट घेतला. बसमधील चालकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यावेळी काही प्रवासी गाढ झोपेत होते. प्रवासी आणि बसचालक तातडीने बसमधून बाहेर पडल्याने गंभीर दुर्घटना टळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा: दुबईतील पावसाचा पुणेकर हवाई प्रवाशांना बसतोय फटका

या घटनेची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दलाचा बंब, देवदूत पथक, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस ठाण्यातील पथक, डेल्टा पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. पहाटे साडेतीनच्या सुमारास आग आटोक्यात आली. बसला आग लागल्यानंतर काही काळ घाटातील वाहतूक थांबविण्यात आली होती. आग आटोक्यात आणल्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या दोन मार्गिक वाहतुकीस खुल्या करण्यात आल्या. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. बसमधील ४२ प्रवासी, तसेच चालक सुखरुप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Near lonavala groom s bus catches fire on mumbai pune expressway in midnight 42 passengers safe pune print news rbk 25 css