पुणे : दुबईतील मुसळधार पावसामुळे तेथील विमानतळावर पाणी साचून विमानसेवा विस्कळीत झाली. हळूहळू तेथील स्थिती पूर्वपदावर येत असली तरी त्याचा फटका पुणे-दुबई विमानसेवेला बसला आहे. पुण्याहून दुबईऐवजी नजीकच्या फुजैरा शहरात विमाने वळविण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
पुणे- दुबई थेट विमानसेवा आहे. ही विमानसेवा दिवसातून एक वेळा असून, स्पाईसजेटकडून या मार्गावर सेवा दिली जाते. दुबईतील मुसळधार पावसामुळे तेथील विमानतळ ठप्प झाले. दुबई विमानतळ १९ एप्रिलला पहाटे ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याने अनेक विमाने रद्द करण्यात आली. यामुळे दुबईला जाणारी आणि तेथून उड्डाण करणारी विमाने फुजैराला वळविण्यात आली. याबाबत स्पाईसजेटने म्हटले आहे की, दुबई विमानतळावरील सेवा पावसामुळे विस्कळीत झाली आहे. यामुळे दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि पुण्याहून जाणारी विमाने दुबईऐवजी फुजैराला जातील. पुणे-दुबई आणि दुबई-पुणे या विमानसेवेसाठी १९ व २० एप्रिलला हा बदल करण्यात आला.
हेही वाचा : शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव म्हणाले, ‘यासाठी’ ही माझी शेवटची निवडणूक!
फुजैरा ते दुबई हे अंतर रस्त्याने १२१ किलोमीटर आहे. दुबईला जाणाऱ्या अथवा दुबईहून येणाऱ्या प्रवाशांना यामुळे फुजैराला दुसऱ्या वाहनाने जाऊन विमान पकडावे लागत आहे. यामध्ये प्रवाशांचा वेळ जात असून, या प्रवासासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. लवकरच ही सेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा : पुणे: पोलीस कारवाईच्या भीतीने बांधकाम ठेकेदाराचा इमारतीवरून पडून मृत्यू
पर्यटनाचा हंगाम नसल्याने फारसा परिणाम नाही
सध्या दुबईमधील पर्यटनाचा हंगाम नाही. तिकडे उष्णता अधिक असल्याने उन्हाळ्यात फारसे पर्यटक जात नाहीत. दुबईमधील पर्यटनाचा हंगाम ऑक्टोबर ते मार्च हा असतो. पुणे-दुबई थेट विमानसेवा आहे. प्रामुख्याने पर्यटनाचा हंगाम सोडून इतर वेळी या सेवेचा वापर कामाशी निगडित लोकांकडून केला जातो. दुबई विमानतळावरील सेवा विस्कळीत झाल्याने मुंबईहून दुबईमार्गे युरोप किंवा अन्य ठिकाणी जाणाऱ्या विमान सेवेला मोठा फटका बसला. पुण्यातून त्याचा फारसा परिणाम झालेला नाही, अशी माहिती विहार ट्रॅव्हल्सचे संचालक ऋषिकेश पुजारी यांनी दिली.