पुणे : रक्ताच्या एका थेंबाद्वारे अवघ्या काही मिनिटांत चाचणी करून सिकल सेल ॲनिमिया या आजाराचे निदान करू शकणारा चाचणी संच देशात विकसित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा चाचणी संच केवळ शंभर रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध केला जाणार आहे. तसेच, या आजारावरील उपचार पद्धतीचा अमेरिकेतील खर्च २८ कोटी रुपये असून, देशात विकसित करण्यात येत असलेल्या उपचार पद्धतीमध्ये तो ५० लाख रुपयांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) महासंचालक डॉ. एन. कलाईसेल्वी यांनी ही माहिती दिली. एमआयटी विश्वशांती विद्यापीठातील शास्त्रज्ञ गोलमेज परिषदेच्या उद्घाटनानिमित्त डॉ. कलाईसेल्वी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘सीएसआयआर’तर्फे देशभरातील प्रयोगशाळांमध्ये सुरू असलेल्या विविध संशोधनांबाबतची माहिती त्यांनी दिली. ‘सिकल सेल ॲनिमिया’ हा एक आनुवंशिक रक्तविकार आहे. हा आजार प्रामुख्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांमध्ये आढळतो. या आजारामुळे शरीरातील लाल रक्तपेशींचे स्वरूप बदलून रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. वेळेवर निदान न झाल्यास गंभीर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर डॉ. कलाईसेल्वी म्हणाल्या, ‘सीएसआयआर’च्या ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायलॉजी’ या प्रयोगशाळेतील डॉ. गिरिराज चांडक यांच्या नेतृत्वाखाली चाचणी संच विकसित करण्यात आला आहे. सिकल सेल ॲनिमिया चाचणी संचाद्वारे अवघ्या काही मिनिटांत निदान होऊन संबंधित व्यक्तीला सिकल सेल आजार आहे का, ती व्यक्ती वाहक आहे का, ती व्यक्ती निरोगी आहे का, हे समजू शकते.
हा संच १०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातही सहज वापरणे शक्य आहे. हा संच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाचा भाग आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांतून हा आजार कमी करणे शक्य होणार आहे. त्याशिवाय, एक औषधही विकसित करण्यात येत आहे. याच आजारावरील उपचार पद्धतीचा अमेरिकेतील खर्च २८ कोटी रुपये असून, देशात विकसित करण्यात येत असलेल्या उपचार पद्धतीमध्ये तो ५० लाख रुपयांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न आहे.’
डॉ. जयंत नारळीकर यांना विज्ञानमहर्षी पुरस्कार
परिषदेच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव डॉ. आशुतोष शर्मा, विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड उपस्थित होते. याच कार्यक्रमात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञानमहर्षी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार त्यांच्या कन्या डॉ. लीलावती नारळीकर यांनी स्वीकारला.