पिंपरी : ऑनलाइन माध्यमातून खेळ (गेम) खेळत असताना झालेल्या ओळखीतून तरुणीकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्यास तरुणीने नकार दिला असता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून बनवलेले अश्लील छायाचित्र तिच्या नातेवाईक आणि मित्रांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बावधन पोलिसांनी आरोपीला मुंबईमधून अटक केली आहे. चिराग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बीजीएमआय (पबजी) ही गेम ऑनलाइन माध्यमातून खेळत होती. मागील १५ दिवसांपूर्वी गेम खेळत असताना तिची आणि आरोपी चिरागची ओळख झाली. या गेममध्ये मॅच मेकिंग पद्धतीने खेळत असताना पीडित तरुणी आरोपीच्या टीम लॉबी मध्ये आली. त्यानंतर ते एकमेकांशी गेममधील व्हॉइस चॅटद्वारे बोलत होते. खेळ संपल्यानंतर आरोपीने पीडित तरुणीच्या समाजमाध्यमातील खात्यावर तिला संदेश केले. त्यातून त्यांच्यात संवाद सुरू झाला. मागील आठवड्यात चिरागने पीडित तरुणीकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र आपण कधीही भेटलो नाही, एकमेकांबद्दल माहिती नाही या कारणामुळे तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला. हा नकार चिरागला पचवता आला नाही.
या रागातून चिरागने समाज माध्यमावर तरुणीचे १३ पेक्षा अधिक प्रोफाईल्स तयार केले. त्या बनावट प्रोफाईल्सद्वारे तो तरुणीला धमक्या देऊ लागला. त्यानंतरही तरुणी नकार दिला. त्यामुळे चिरागने ‘एआय’च्या मदतीने तरुणीचे अश्लील छायाचित्र तयार केले. ते तरुणी, तिचे कुटुंबीय आणि मित्रांना समाज माध्यमातील खात्यावर पाठवले. चिरागने तरुणीच्या खात्यावर असलेल्या मैत्रिणींचे देखील असेच छायाचित्र तयार केले. ते छायाचित्र पीडित तरुणीच्या मैत्रिणींना पाठवून त्यांना धमकी दिली. तरुणीला त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास सांगण्याची धमकी दिली. याबाबत पीडित तरुणीने बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपी चिराग याचा शोध घेतला. तो कर्जत येथे असल्याचे समजल्याने पोलिसांनी त्याला कर्जत मधून अटक केली. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.
ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने १९.५३ लाखांची फसवणूक
चिखली परिसरात ऑनलाइन ट्रेडिंगमधून जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीची १९ लाख ५३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी बनावट अॅप आणि खोटे बँक व्यवहार वापरून हा गुन्हा केला. ही घटना पाटीलनगर, चिखली येथे घडली.
याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना समाज माध्यमातील एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट केले. त्यांना ट्रेडिंगबाबत माहिती देऊन त्यात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगण्यात आले. गुंतवणूक म्हणून फिर्यादीकडून १९ लाख ५३ हजार रुपये घेतले. त्यांना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
नोकरीच्या नावाखाली १५ लाखांची फसवणूक
कोलकाता मेट्रो व बँकेत नोकरी लावतो असे सांगून एका महिला आणि तिच्या नातेवाईकांकडून १५ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना चऱ्होली परिसरात घडली.
याबाबत ३५ वर्षीय महिलेने याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिच्या भावास कोलकाता मेट्रो रेल्वेत नोकरी लावतो असे सांगितले. रुजू होण्याचे खोटे पत्र देऊन १० लाख ५० हजार रुपये घेतले. तसेच फिर्यादी महिलेचे नातेवाईक यांना एका बँकेमध्ये शिपाई पदावर नोकरी लावतो असे सांगून आणखी पाच लाख रुपये घेतले. नोकरी न देता फसवणूक केली. फिर्यादी यांनी दिलेली रक्कम परत मागितल्यावर आरोपीने शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.