पुणे : कोल्हापूरला निघालेल्या प्रवासी तरुणाला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली. प्रवासी तरुणाकडील सोनसाखळी, मोबाइल संच, रोकड असा ३५ हजारांचा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले.
याबाबत एका तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी तरुण शुक्रवारी (३० मे) रात्री बाराच्या सुमारास कोल्हापूरला निघाला होता. बाह्यवळण मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या थांब्यावर तो थांबला होता. त्या वेळी मोटारीतून चौघेजण आले. त्यांनी तरुणाला कोल्हापूरला सोडतो, असे सांगितले. तरुण मोटारीत बसला. त्यानंतर चोरट्यांनी मोटार बाह्यवळण मार्गावरून खेड शिवापूरकडे नेली.
प्रवासादरम्यान चोरट्यांनी तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील दोन हजारांची रोकड, मोबाइल संच, सोनसाखळी असा मुद्देमाल लुटला. ससेवाडी परिसरात तरुणाला सोडून चोरटे मोटारीतून पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहेत.