पुणे: नागरिकांना एका भागातून दुसऱ्या भागात जा-ये करणे सोयीचे व्हावे, तसेच मेट्रो स्टेशनपासून इच्छितस्थळी जाण्यासाठी बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात एक हजार बस दाखल होणार आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या माध्यमातून ५००, तर पीएमआरडीएकडून ५०० बसची खरेदी केली जाणार आहे. मंगळवारी झालेल्या पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. पुणे महापालिकेचे आयुक्त आणि पीएमपीचे संचालक डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

पुणे महापालिका ३०० बस, पिंपरी-चिंचवड महापालिका २०० बस, तर पीएमआरडीए ५०० बसची खरेदी करून त्या पीएमपीला देणार आहे. या बस १२ मीटर लांबीच्या असून, सीएनजीवरील आहेत. एका बससाठी ४८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. काही महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपीसाठी दोन्ही महापालिका आणि पीएमआरडीएने एक हजार बसची खरेदी करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता.

शहरातील प्रवाशांना कमी दरात बससेवा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. तसेच, शहरात उभारण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पाचा वापर करून मेट्रो स्थानकापासून घरापर्यंत जाण्यासाठी फिडर सेवा देता यावी, यासाठी बसची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या हितासाठी पाचशे बसची खरेदी महापालिकेकडून केली जाणार आहे. यासाठी पुणे महापालिका ६० टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिका ४० टक्के आर्थिक भार उचलणार आहे. नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी असल्याने दोन्ही महापालिका बस खरेदीचा खर्च उचलणार असल्याचे आयुक्त डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

या बसखरेदीसाठी महापालिकेकडून २३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पीएमपीकडून पीएमआरडीएच्या हद्दीतील १२२ मार्गांवर बससेवा पुरविली जाते. त्यामुळे ५०० बसची खरेदी पीएमआरडीएकडून केली जाणार आहे. या बस खरेदीची लवकरच सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून निविदा काढली जाणार आहे.