पिंपरी : पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय सेवा चांगल्या असल्याने रुग्णालयात पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख सातत्याने वाढत आहे. जुलै २०२४ ते जून २०२५ या दरम्यान बाह्यरुग्ण विभागात १७ लाख ८७ हजार १९ रुग्णांनी उपचार घेतले. यामध्ये महापालिका हद्दीबाहेरील सरासरी ३० टक्के रुग्ण असल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची औद्याेगिकनगरी, कामगारनगरी म्हणून ओळख आहे. शहर आणि परिसरात भाेसरी, चाकण, रांजणगाव, तळेगाव दाभाडे एमआयडीसी, हिंजवडी, तळवडे माहिती व तंत्रज्ञाननगरी (आयटी पार्क) आहे. यामध्ये उच्च शिक्षितांपासून अशिक्षितांच्या हाताला राेजगार मिळत आहे. त्यामुळे देशाच्या कानाकाेपऱ्यातून हजाराे लाेक शिक्षण, व्यवसाय, नाेकरीनिमित्त शहरात वास्तव्यास येत आहेत.

शहर चारही बाजूंनी विस्तारत असून लाेकसंख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. या लाेकसंख्येला जागतिक आराेग्य संघटनेच्या मानांकनानुसार एक हजार लाेकसंख्येमागे तीन खाटा बंधनकारक आहेत. त्यानुसार ३० लाखांच्या लाेकसंख्येला नऊ हजार खाटा उपलब्ध असणे गरजेचे आहे. महापालिकेच्या रुग्णालयात एक हजार ५४९ तर शहरातील ६३० खासगी रुग्णालयात १५ हजार ८९६ अशा एकूण १७ हजार ४४५ खाटा उपलब्ध आहेत. महापालिकेने आठ माेठी रुग्णालये, ३० दवाखान्यांसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या रुग्णालयात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाचा मनुष्यबळावर ३०० काेटी, औषधांसाठी ३० काेटी, सर्जिकल साहित्यासाठी ३० काेटी, प्रयोगशाळेतील रसायनांसाठी ५० काेटी तर इतर बाबींसाठी ९० काेटी असा ५०० काेटी रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, शहराबाहेरील रुग्णांची संख्या वाढली आहे.

वैद्यकीय विभागाने शहरातील आठ मोठ्या रुग्णालयांपैकी वायसीएम, आकुर्डी, भाेसरी, जिजामाता आणि थेरगाव या पाच रुग्णालयांतील रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. बाह्यरुग्ण विभागात १७ लाख ८७ हजार १९ रुग्णांनी उपचार घेतले. यामध्ये महापालिका हद्दीतील १२ लाख ५० हजार ११४ (७० टक्के) तर हद्दीबाहेरील पाच लाख ३६ हजार १०५ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्याचे प्रमाण ३० टक्के आहे.

नाममात्र दरात उपचार

महापालिकेच्या रुग्णालयात बाह्यरूग्ण विभागात उपचार घेण्यासाठी २० रुपयांचा केसपेपर आणि औषधांसाठी २० रुपये शुल्क आकारले जाते. आंतररुग्ण विभागातील शस्त्रक्रिया करण्यासाठीही विविध शासकीय याेजनांचा लाभ देण्यासह कमी दरात रुग्णांवर शस्त्रक्रिया हाेत आहेत. त्यामुळे बाहेरील रुग्ण शहरात उपचारासाठी येणाचे प्रमाण वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिकेच्या पाच मोठ्या रुग्णालयांत आलेल्या हद्दीतील व हद्दीबाहेरील रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. त्यात हद्दीतील ७० टक्के तर हद्दीबाहेरील ३० टक्के रुग्ण महापालिका रुग्णालयांत उपचारासाठी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. – डाॅ. लक्ष्मण गाेफणे, आराेग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.