पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली होऊन मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांची पोलीस आयुक्तपदी निवड झाल्याची जोरदार चर्चा पिंपरीत रंगली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी दबक्या आवाजात समाधान व्यक्त करत आहेत. परंतु, हा प्रकार म्हणजे एप्रिल फुल असल्याचं सांगण्यात येत असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयर्नमन कृष्ण प्रकाश हे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते नेहमी चर्चेत आहेत. अनेकांवर त्यांनी धडक कारवाई करत शिस्तीचा धडा देखील पोलीस कर्मचाऱ्यांना शिकवला. परंतु, हे करत असताना त्यांनी अनेकांची मने दुखावली अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. धडक कारवाईच स्वागतच आहे. मात्र, मर्जीतील अधिकाऱ्यांवर जास्त प्रेम असल्याचं वेळोवेळी पुढे आलेले आहे, असं पोलीस खात्यामधील अधिकारी कर्मचारी सांगतात. 

त्यातच, आज एक एप्रिल असून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. विविध व्हाट्सअप ग्रुपवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची तडकाफडकी बदली झाली असून मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाल्याचा मॅसेज व्हायरल होत आहे. अनेक अधिकाऱ्यांनी एकमेकांना फोन करून कृष्ण प्रकाश यांची बदली झालीय का? हे विचारत आहेत. कृष्ण प्रकाश यांची बदली व्हावी म्हणून अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी देव पाण्यात ठेवलेत ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात याअगोदर झालेल्या दोन्ही पोलीस आयुक्तांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यामुळं पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे कार्यकाळ पूर्ण करणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad commissioner krishna prakash replaced with vishwas nangare patil april fool message in talks among police kjp scsg