पिंपरी चिंचवड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असून यानिमित्त महाराष्ट्रासह अवघ्या देशभरात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत. पिंपरी- चिंचवडमधील भक्तीशक्ती या ठिकाणी पिंपरी-चिंचवडमधील शिवप्रेमींनी एकत्र येऊन अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली. भक्तीशक्ती या ठिकाणी ५५ ढोल पथके, दीड हजार वादक, साडेचारशे ताशांच वादन करत ३५१ भगव्या ध्वजाद्वारे मानवंदना दिली. यावेळी हे अनोखे वादन पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.

पिंपरी- चिंचवडच्या भक्तीशक्ती चौक या ठिकाणी हजारो ढोल एकत्र आल्याने अवघा चौक दुमदुमून निघाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवडमधील शिवभक्तांनी एकत्र येऊन अनोखी संकल्पना राबवली. शहरातील विविध ५५ ढोल पथके एकत्र आले यामध्ये दीड हजाराहून अधिक वादकांनी ढोल ताशाचा वादन केलं.

आणखी वाचा-राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांविरुद्ध गु्न्हा; चौसिंगा, तरसाचे बेकायदा स्थलांतर; वन्यप्राणी नोंदीत तफावत

यामध्ये साडेचारशे ताशा, पंधराशे वादक, ५५ ढोल पथके आणि ३५१ ध्वज होते. या ध्वजाद्वारे अनोख्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. भक्ती शक्तीच्या शिल्पाला ध्वजाने प्रदक्षिणा घालून मानवंदना देऊन ढोल वादनाला सुरुवात केली. यावेळी अवघा परिसर ढोल वादनाने दुमदुमून निघाला. हजारो नागरिक हे दृश्य बघण्यासाठी रस्त्यावर थांबले होते. त्यांनी हा अनोखा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपल्याचं बघायला मिळालं.