पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिक, गोरगरिबांना कोणताही त्रास होता कामा नये. पदपथावर उभी केलेली वाहने, मोटारी अगोदर उचलाव्यात. त्यानंतर फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर कारवाई करावी. अतिक्रमण कारवाईत दुजाभाव होता कामा नये,’ अशी सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना केली. तसेच सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे विषयपत्र महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार शुक्रवारी स्वीकारला. त्यानंतर विभागप्रमुखांची बैठक घेऊन त्यांनी विविध सूचना दिल्या. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे या वेळी उपस्थित होते.
‘शहरात नियमितपणे स्वच्छता करावी. कचरा कोठे होता कामा नये. रस्ते, पदपथांवर कचरा साचता कामा नये. जिथे कचरा दिसेल, तेथील जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव मला सांगावे. पाणीपुरवठा विस्कळीत होऊ देऊ नका, पुरेसा आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा. सद्य:स्थितीत कोणतेही नवीन प्रकल्प आणू नयेत. केवळ तातडीचे प्रस्ताव आणावेत,’ अशा सूचना आयुक्त हर्डीकर यांनी दिल्या. ‘पिंपरी-चिंचवड शहर राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. शहरातील स्वच्छता, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, पर्यावरणसंवर्धन आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रांत सतत प्रगती साधली जात आहे. नागरिक, महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शहर विकासाच्या नव्या दिशा ठरवत, नागरिकाभिमुख प्रशासन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,’ असेही ते म्हणाले.
निवडणूक होईपर्यंत हर्डीकर यांच्याकडेच जबाबदारी?
महापालिका निवडणुकीची तयारी सुरू आहे. ती जानेवारीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत हर्डीकर यांच्याकडेच आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुकीनंतरच नवीन आयुक्तांची नियुक्ती होईल, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
संगीत खुर्ची, रस्सीखेच खेळाचा आनंद
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच, संगीत खुर्ची यासह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आमदार अमित गोरखे यांनी रस्सीखेच व संगीत खुर्ची या खेळात सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला.
माझ्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. तो किती दिवस असेल हे माहिती नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.