पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ४१ प्रभागांमधून तब्बल ५ हजार ८४३ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या. या हरकती आणि सूचनांवर सोमवारपासून (८ सप्टेंबर) सुनावणी घेण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात ही सुनावणी घेतली जाणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी १६५ सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे. ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय करण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमुळे महापालिका प्रशासनाने यंदाच्या वर्षी नव्याने प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे. गेल्या महिन्यात २२ ऑगस्टला राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने प्रभागांची प्रारूप रचना जाहीर करून त्यावर हरकती मागविल्या होत्या. हरकती मागविण्याची मुदत गुरुवारी (४ सप्टेंबरला) दुपारी तीन वाजता संपली. हरकती आणि सूचना करण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत ५ हजार ८४३ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या. महापालिकेची पंधरा क्षेत्रिय कार्यालये आणि सावरकर भवन येथील निवडणूक कार्यालयात या हरकती, सूचना नोंदविण्यात आल्या.

सर्वाधिक हरकती प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बुद्रुकमधून आल्या आहेत. त्यांची संख्या २ हजार ६६ इतकी आहे. त्यापाठोपाठ प्रभाग क्रमांक ३ विमाननगर – वाघोलीमधून ८१९ हरकती, सूचना दाखल झाल्या आहेत. मध्यवर्ती भाग असलेल्या प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई, प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी आणि प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनीमधून एकही हरकत आली नसल्याचे समोर आले आहे.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधून सर्वांत अधिक हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. तीन हजारांपेक्षा अधिक हरकती या केवळ चार प्रभागांतून नोंदविण्यात आल्या आहेत. महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या नऱ्हे-वडगाव बुद्रुक या प्रभागातून वडगाव गावठाण वगळण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील राजकीय पक्षांच्या काही कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून हरकती, सूचनांचे अर्ज भरून घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. विमाननगर-वाघोली प्रभागात लोकसंख्यानिहाय अनुसूचित जातीसाठी एकही जागा सुटत नसल्याने संबंधित समाजाची लोकवस्ती या प्रभागाला जोडण्याबाबत मोठ्या प्रमाणावर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.

मांजरी बुद्रूक – साडेसतरा नळी या प्रभागामध्ये नदीची नैसर्गिक हद्द ओलांडून जोडलेली थिटे वस्ती वगळावी या मागणीसाठी मोठ्या संख्येने हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. तर एकमेव पाच सदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ कात्रज – आंबेगाव येथूनही १६८ हरकती नोंदविण्यात आल्या असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

– ४२ पैकी ९ प्रभागांतून शंभरहून अधिक हरकती

– नऱ्हे- वडगाव बुद्रुक प्रभागातून सर्वाधिक हरकती

– मध्यवर्ती पेठांच्या भागातील ३ प्रभागांतून एकही हरकत नाही

– सहा प्रभागांतून एक आकडी हरकती

महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर ४५ स्वरुपाच्या हरकती आल्या आहेत. केवळ पाच प्रभागांतून निम्म्याहून अधिक हरकती आल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी देण्यासाठी वेळापत्रक तयार केले जाईल. बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सनदी अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होईल.- ओमप्रकाश दिवटे,अतिरिक्त महापालिका आयुक्त