पुणे : नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या तक्रारी महापालिकेकडे करता याव्यात, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पीएमसी रोड मित्र’ ॲपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या २१ दिवसांत या ॲपवर खड्ड्यांबाबत एक हजारापेक्षा अधिक तक्रारी आल्या असून, त्यापैकी ९७६ तक्रारींचे ७२ तासांत निवारण करण्यात आले. महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली.

या मोबाईल ॲपवर करण्यात आलेल्या तक्रारींबरोबरच त्याच परिसरात असलेले इतर खड्डेही तातडीने दुरुस्त करून रस्ते खड्डे मुक्त करण्यात यावे, अशा सूचना संबंधित पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे पावसकर यांनी सांगितले. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. खड्डे पडलेल्या रस्त्यावरून वाहन चालविताना नागरिकांना कसरत करावी लागते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने यंदा खड्डे दुरुस्तीची मोहीम सुरू केली.

एक एप्रिलपासून सुमारे १३ हजार खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यासाठी २५ हजार ५५० टन डांबर वापरून ५६ हजार चौरसमीटर डांबरीकरण करण्यात आले. एक हजार ३७० चेंबर्स झाकणे समपातळीवर घेण्यात आली, तर नियमित पावसाचे पाणी साठणाऱ्या शहरातील ३९४ ठिकाणांवर (स्पॉटवर) दुरुस्तीची कामे करण्यात आली.

शहरातील नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची माहिती थेट महापालिका प्रशासनाकडे देता यावी, यासाठी महापालिका प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात ‘पीएमसी रोड मित्र हे ॲप’ सुरू केले. यावर नागरिकांकडून खड्ड्यांचे अक्षांश- रेखांश आणि त्याचे फोटोसह तक्रारी मागवून घेण्यास सुरुवात करण्यात आली. शहराचील रस्त्यांवर पडलेले खड्डे ७२ तासांमध्ये बुजविण्याचे उद्दिष्ट पथ संबंधित विभागातील अभियंत्यांना देण्यात आले आहे. आतापर्यंत खड्डे पडल्याच्या एक हजार ४ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी ९७६ तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

महापालिकेने सुरू केलेल्या मोबाईल ॲपवर खड्डे पडल्याच्या तक्रारी येणे ही चांगली गोष्ट आहे. आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन ठराविक वेळेत त्याचे निर्मूलन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी या ॲपवर आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये रस्त्याच्या आजूबाजूच्या भागांत असलेली मात्र तक्रार आली नाही, असे खड्डेदेखील दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, पुणे महापालिका