पुणे : ‘गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेल्या बससेवेचे ६ कोटी रुपये देण्यात यावेत,’ अशी मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे (बार्टी) केली आहे. ‘याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून, मंजुरी मिळताच देयकाची रक्कम देण्यात येईल,’ असे उत्तर ‘बार्टी’ने दिले आहे.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी शहर, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण भागासह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येतात. त्यांना कोरेगाव भीमा येथे जाण्यासाठी ‘पीएमपी’ची सेवा उपलब्ध करून देण्यात येते. ‘पीएमपी’ने गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारपासून आणि एक जानेवारी रोजी लोणीकंद, शिक्रापूर या मार्गापर्यंत विनाशुल्क सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी टप्प्यानुसार सुमारे ५०० बस उपलब्ध करून देण्यात आल्या. याची देय रक्कम सहा कोटी रुपये झाली आहे.
‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून ‘पीएमपी’चे आर्थिक गणित कोलमडले आहे. या वर्षी वित्तीय तूट वाढली आहे. ही तूट कमी करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सेवेसंदर्भात ‘बार्टी’ला पत्र पाठवून देयक मिळावे, अशी मागणी केली आहे.’
दरम्यान, कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाच्या अभिवादन सोहळ्याची पूर्वतयारी करण्यास सुरुवात झाली आहे. अभिवादन करण्यासाठी दूर- दूरवरून येणाऱ्या अनुयायांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर नियोजनासंदर्भात बैठका घेण्यात येत आहे. विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, शहर आणि ग्रामीण पोलीस, वाहतूक विभाग, पीएमपी, समाज कल्याण, बार्टी आणि इतर विभागांकडून नियोजन करण्यात येत असून यंदाचा सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी सामाजिक संस्था देखील उत्साहाने सहभागी होताना दिसून येत आहे.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी अनुयायांना सुलभ सेवा मिळावी, म्हणून ‘पीएमपी’कडून सेवा घेण्यात येते. गेल्या अभिवादन सोहळ्यासंदर्भातील देयकाबाबत ‘पीएमपी’चे पत्र प्राप्त झाले आहे. याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सरकारकडून मंजुरी मिळताच देयक दिले जाईल. – सुनील वारे, महासंचालक, बार्टी
