पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील नवीन टर्मिनल इमारतीपर्यंत बस नेहण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) प्रस्ताव राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव फेटाळला. त्यामुळे हवाई प्रवाशांना एरोमाॅल आणि परिसरापासून टर्मिनलपर्यंत चालत जावे लागणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांना विलंब होत आहे. तसेच, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील खासगी कॅब, रिक्षा यांना एरोमाॅल परिसरापर्यंतच प्रवेशाची मुभा असून ‘पीएमपी’ची एरोमॉल समोरील चौकापर्यंतच सेवा आहे. पुणे विमानतळ या शेवटच्या स्थानकावर प्रवाशांना उतरताना रस्त्याच्या कडेला बस थांबल्यावर पाठीमागे वाहतूक कोंडी होते. तसेच, पीएमपी माघारी वळविण्यासाठी जागा अपुरी पडत असून, प्रवाशांना नवीन टर्मिनलपर्य़ंत प्रवासी सामान, साहित्य पिशव्या घेऊन चालत जावे लागते. त्यामुळे पीएमपी सेवा टर्मिनलपर्यंत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने विमानतळ प्रशासनाकडे मागणी प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार पीएमपी आत उभ्या करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

याबाबत मंगळवारी बैठक घेण्यात आली. पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे आणि हवाई दलाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मात्र, ‘नवीन टर्मिनल इमारत भारतीय हवाई दलाच्या परिसरात आहे. कडक सुरक्षा नियमांनुसार टर्मिनलपासून १०० मीटरच्या परिघात वाहतूक किंवा सार्वजनिक हालचालींना परवानगी देता येणार नाही,’ असे स्पष्टीकरण ढोके यांनी दिले. प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही प्रयत्नशील असलो, तरी प्रथम प्राधान्य राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे,’ असे ढोके यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टर्मिनलपर्यंत पीएमपी नेता येणार नसली, तरी पीएमपीला लवकरच स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पर्यायांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, विमान प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरूच असतील. – पंकज देवरे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल